आष्टी (प्रतिनिधी): आष्टी तालुक्यातील बावीसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसत आहे. गाय, शेळ्या यांच्यावर हल्ला केल्याच्या घटना घडत असत. परंतु तरुण शेतकरी शेतात बैल घेऊन जात असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बावी(दरेवाडी) येथील राजेंद्र विश्वनाथ गोल्हार वय (36)मृत अवस्थेत सापडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हल्ल्यानंतर तो गायब झाल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीती पसरली होती, ती आता दु:खात बदलली आहे.
घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी , आष्टी प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून शोधकार्य सुरू केले होते. काही वेळाने या शोधात राजेंद्र गोल्हार हे मृत अवस्थेत सापडले. मृतदेहाची स्थिती भीषण होती, त्यांचा एक पाय मृतदेहाला नसल्याचे समोर आले, गळ्याला इजा झाली आहे हा भयावह दृश्य पाहून गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाकडून गावकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परिसरातील सर्व नागरिकांना रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये, अशी कठोर सूचना केली आहे. विशेषत: संध्याकाळानंतर एकट्याने फिरणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. जंगली जनावरांपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.या संदर्भात बावी येथील मा. सरपंच एम.डी. लटपटे यांनी घटनेची पुष्टी केली आहे. प्रशासन आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.