पाथर्डी प्रतिनिधी:-
केवळ ग्रंथांचा संग्रह म्हणजे ग्रंथालय नसून ग्रंथ, वाचक आणि ग्रंथपाल या तीन घटकांचे एकत्रीकरण म्हणजे खरे ग्रंथालय होय. ज्ञान मिळवण्याचा सर्वात मोठा आणि उत्तम मार्ग म्हणजे ग्रंथालय असून समृद्ध ग्रंथालये ही कोणत्याही समाजातील वैचारिक वैभवाची साक्ष देत असतात असे प्रतिपादन बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बबन चौरे यांनी केले. ते ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या १३३ व्या जयंती कार्यक्रमानिमित्त बोलत होते. यावेळी ग्रंथपाल डॉ किरण गुलदगड, डॉ अरुण राख, प्रा आनंद घोंगडे, प्रा शरद बोडखे, प्रा विनोदकुमार चेमटे, प्रा संदीप कराड, प्रा दादासाहेब बडे, अभिजीत आव्हाड उपस्थित होते.
डॉ. चौरे पुढे म्हणाले, आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये जी प्रगती झाली त्यामध्ये सर्वाधिक योगदान पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे आहे भारतात ग्रंथालयशास्त्र ही संकल्पना शास्त्रशुद्ध रीतीने रुजवून तिला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम डॉ. रंगनाथन यांनी केले. ग्रंथालय हेही एक व्यवस्थापनशास्त्र असून त्याकडे समाजभिमुख दृष्टीने पाहिले जावे हा विचार सर्वप्रथम डॉ रंगनाथन यांनी मांडला. ग्रंथालय हे गरीब विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. महापुरुषांची चरित्रे आणि उपदेशात्मक कथा लोकांचे जीवन बदलवतात तसेच कविता आणि नाटके मानवी आनंद प्रदान करतात.
आजच्या युगात वाचनाची आवड कमी झाली नसून त्याचे मूळ स्वरूप बदलले गेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये आहे त्यामुळे आपल्याला प्राप्त होत असलेली माहिती अजाणतेपणी विश्वास न ठेवता, विचार न करता आत्मसात करणे ही चूक असून सखोल ग्रंथवाचन मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो संपूर्ण माहिती ग्रंथाद्वारे मिळेल हे त्रिवार सत्य आहे. ग्रंथालय हे प्रत्येक महाविद्यालयाचा आत्मा असून विद्यार्थी विकासात ग्रंथालयाची भूमिका महत्वाची आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगत युगामध्ये ग्रंथालये व ग्रंथपालांनी वाचकांना पुन्हा ग्रंथालयांकडे वळविण्यासाठी जोमाने प्रयत्न करणे हेच डॉ. रंगनाथन यांचे खरे स्मरण ठरणार आहे असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रा. मन्सूर शेख व ग्रंथपाल डॉ किरण गुलदगड यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथालय उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता अकरावी या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील साहित्यसंपदेची तसेच ग्रंथालयीन कामकाजाची माहिती यावेळी करून देण्यात आली.