अहिल्यानगर (प्रतिनिधी):शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्य संमेलनासाठी राज्यभरातील अनेक साहित्यिक,लेखक कवी आणि नवलेखकांनी नोंदणी केली असून हा साहित्य संवाद चळवळीतील साहित्यिकांसाठी मोठा नजराना ठरेल* असा विश्वास शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी व्यक्त केला.
शब्दगंध साहित्यिक परिषदेची आढावा बैठक संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच कोहिनूर मंगल कार्यालयात पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. साहित्य संवाद २०२५ चे नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र चोभे पाटील,प्रा.डॉ.अनिल गर्जे प्रा. डॉ.तुकाराम गोंदकर, मकरंद घोडके इ. प्रमुख उपस्थित होते.
आळंदी देवाची येथील साहित्य संवाद कार्यक्रमाचे ठिकाण, संवाद कार्यक्रमात घेण्यात येणारे सत्र,काव्य संमेलनाचे नियोजन, शब्दगंध चे विविध पुरस्कार बद्दलची चर्चा या बैठकीत करण्यात आली. वेगवेगळ्या भागातून येणारे सदस्य, कवी, साहित्यिक यांची प्रवास व निवास व्यवस्था बाबत चर्चा करून प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली.
हा कार्यक्रम जास्तीत जास्त युवा वाचक वर्ग, नवोदित साहित्यिक यांच्यापर्यंत पोहचावा यासाठी शब्दगंधच्या सोशल मीडिया टीमकडून आढावा घेण्यात आला. जास्तीत जास्त वेब पोर्टल, प्रादेशिक वाहिन्या, साहित्यिक पुरवण्या, तसेच साहित्य चळवळी संबंधित फेसबुक पेजेस, इन्स्टा हँडल्स, एक्स अकाउंट यांना युवा टीम संपर्क साधणार आहे. यासाठी शब्दगंधचे सोशल मीडिया प्रमुख मकरंद घोडके यांची निवड करण्यात आली. यामध्ये अमोल उदागे,दिशा गोसावी, भाग्यश्री राऊत,निखिल गिरी,ऋषिकेश राऊत यांची युवा समिती गठित करण्यात आली.
करवीर काशी,कोल्हापूर चे संपादक सुनीलकुमार सरनाईक, धुळे येथील अभिनव खानदेशचे प्रभाकर सूर्यवंशी,अभियंता मित्र चे संपादक कमलकांत वडेलकर यांच्या सह अनेकांना विशेष निमंत्रित करण्यात येत आहे.या निमित्ताने सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या चार लेखक, कवी व कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. काव्य संमेलनात सहभागी होणाऱ्या कवींना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार असुन त्याची रचना व डिझाईन बद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली.
या कार्यक्रमात होणाऱ्या काव्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी नवोदित कवींनी ९९२१००९७५० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ज्ञानदेव पांडुळे, प्रा.डॉ.अशोक कानडे, भगवान राऊत,प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे, भारत गाडेकर, जयश्री झरेकर, स्वाती ठुबे, राजेंद्र फंड, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, अरुण आहेर, रवींद्र दानापुरे,प्रशांत सूर्यवंशी, शर्मिला गोसावी, राजेंद्र पवार, शिरीष जाधव, विठ्ठल सोनवणे यांनी केले आहे.