आष्टी (प्रतिनिधी) – सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये मराठी माध्यमाच्या शाळा बाजूला जाऊन इंग्रजी माध्यमांनी त्यावरती अतिक्रमण केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. परंतु मराठी शाळा टिकल्या तरच गरीब ,कष्टकरी ,सर्वसामांन्याची मुले शिक्षण घेतील नाहीतर इंग्रजी माध्यमाच्या शाळेला पहिलीच्या वर्गापासूनच लाखो रुपयांच्या फीस घेतल्या जातात परंतु शिक्षण मात्र तसं मिळत नाही. याउलट जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मोफत , दर्जेदार आणि आनंददायी शिक्षण मिळते. यासाठी पालकांनी आपल्या मुलाचा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेऊन जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवल्या पाहिजेत नाहीतर भयान वास्तव समोरील येईल की , सर्वसामान्यांची मुलं शिक्षणापासून कायमचे वंचित राहतील हे सर्व टाळण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळेतच पालकांनी प्रवेश घेतले पाहिजेत व आपल्या मुलांना तणावमुक्त शिक्षण दिले पाहिजे यातूनच अनेक उच्चपदस्थ अधिकारी घडल्याचा इतिहास आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध निवेदक तथा पत्रकार अमोल जगताप यांनी केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , जि. प. कें. प्रा. शा. शिराळ ता. आष्टी येथे दि. १६ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना मोफत गणवेश , पाठ्यपुस्तके तसेच शूज इत्यादी शालेय साहित्य देऊन इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या नवागत मुलांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमोल जगताप हे बोलत होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष दाणी यांनी मुलांना अनेक वेगवेगळ्या मार्गाने शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व शासकीय योजना याबद्दल सविस्तर माहिती देऊन विद्यार्थ्यांनी शाळेत शंभर टक्के उपस्थित राहून गुणवत्तापूर्ण शिक्षण घ्यावे व शाळेची शिस्त पाळून आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे असे आव्हाहन केले.या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक परमेश्वर जगताप , मंगल झगडे , राजेंद्र ढवण , सतीश शिंदे यांच्यासह पालक आजिनाथ जगताप , शरद आजबे , किरण खंडागळे आदी उपस्थित होते.
यावेळी इयत्ता पहिलीच्या मुलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
➡️ स्वादिष्ट गोड भोजनाने मुलांचे स्वागत
इयत्ता पहिलीच्या वर्गात दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून मोफत पाठ्यपुस्तके , गणवेश व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मुलांना प्रधानमंत्री पोषण आहार योजनेअंतर्गत स्वादिष्ट असा गोड शिरा खाऊ घालून मुलांचे स्वागत करण्यात आले. यामुळे दिवसभर मुलांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहत होता.