कडा (प्रतिनिधी):- मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली चाळीस दिवसांची मुदत काल (ता.२४) संपली. त्यात आरक्षण न मिळाल्याने मराठा समाज आता अधिक आक्रमक झाला आहे. त्यांनी पुढाऱ्यांना गावबंदी आंदोलन सुरू केले असून, त्यानंतर राजीनामा अस्त्रही उगारले आहे.
आष्टी तालुक्यातील टाकळसिंग येथील ग्रामपंचायत सदस्या सुनिता सुनिल जगताप यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या पहिल्यांदाच निवडून येऊनही त्यांनी राजीनामा देण्याचे धाडस दाखवले आहे. गावबंदी सारखी नव्या अस्त्राची व्याप्तीही वाढत जाण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यास मराठवाड्यातून सुरुवात झाली, तर आष्टी तालुक्यातील पहिला ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देण्यात आला.त्यानंतर तालुक्यातून आता राजीनाम्याचे हत्यार आरक्षणासाठी उपसले गेले आहे. जगताप यांनी ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच तेथे पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचेही मराठा समाजाने ठरवले. यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी आष्टी तालुक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक व कडा येथे महेश मंदिर येथे दि.२६ ऑक्टोबरपासून सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून जगताप यांनी दिलेला
*राजीनामा टाकळसिंगच्या सरपंचांनी स्वीकारला*.
मराठा समाजाच्या मागणीसाठी राजीनामा दिल्याचे सुनिता जगताप यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. तशीच भावना त्यांचे पती सुनील जगताप यांनी व्यक्त केली. पत्नीने राजीनामा दिला, तरी त्याचा आनंद आहे, कारण समाजाला आरक्षण मिळण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने पाऊल टाकले पाहिजे, असे ते म्हणाले.
आपल्याकडे जे आहे, ते प्रत्येकाने दिले पाहिजे, असे अपेक्षावजा आवाहन त्यांनी केले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर जाहीरपणे सुनीता जगताप यांनी आपला राजीनामा सरपंचाकडे दिला तेव्हा मराठा समाजाच्या वतीने त्याचे आभार मानण्यात येत आहेत