spot_img
spot_img

चिचोडी पाटील येथील लेखक मारुती खडके यांनी लिहिली परंगणा कांदबरी

ओळख आणि अस्विकृतीचा संघर्ष “परांगणा” तील तृतीयपंथीय जग – सुभाष सोनवणे

पाटिल चिचोडी प्रतिनीधी (संतोष जाधव)- ज्यांच्या जीवना मध्ये पराकोटीच्या दीर्घ वेदना आहेत. तसेच स्वतःच्या मर्जी प्रमाणे जगण्याचे समाधानही नाही . समाजाच्या अवहेलनांचे शल्य सततच आहे. अनेक भावबंधात त्यांची दुनिया गुंफलेली आहे.त्यांच्या जगा बद्दल सांगाव्या अशा अनेक वेदनादायी आणि तितक्याच रंजल्या गांजलेल्या गोष्टी आहेत. त्यांचे विश्व निराळे आहे. त्यांच्या रिती -भाती आणि संस्कार वेगळे आहेत. रितीरिवाज वेगळे आहेत.त्यांचा देवही वेगळा आहे.”इरावन” हा त्यांचा देव . त्याच्या बरोबरच ते एक दिवसाचे लग्न करतात. सकाळी लगेच बांगड्या फोडून कुंकू पुसून विधवा होवून पांढरी साडी घालतात. त्यांची प्रेत यात्राही सर्व लोक सामसूम झाल्यावर रात्री बारा वाजता काढतात.असे सर्व रितीरिवाज. असा हा समाजाने झिडकारलेला,टाकून दिलेला ,दूर केलेला,दीर्घ वेदना व शून्य नजरा घेऊन जगणारा असा एक वर्ग म्हणजे… तृतीयपंथी,हिजडा किंवा किन्नर होय.शरीर रचना पुरुषाची असणारा आणि त्याची लैंगिक ओळख ,वेशभूषा आणि लैंगिक भूमिका स्त्री प्रमाणे असणारा व्यक्ती होय.
तृतीयपंथी जन्माला येण्याचे अनेक कारणे आहेत
गुणसूत्रे हे एक मोठे कारण आहे.तसेच ते पुरुष प्रजनन विकास संस्थेवर अवलंबून आहे. जर पुरुष लिंग प्रबळ आहे तर त्याला हिजडा म्हणतात. स्त्री लिंग प्रबळ असेल तर त्याला जनाना म्हणतात. काही वेळा स्री लिंग प्रबळ असेल तर खऱ्या स्री पेक्षाही जनाना सुंदर दिसतात.
शरीराने स्त्रियां सारख्या दिसत असल्या तरी त्या सर्व सामान्य स्री सारखा विवाह करू शकत नाही व पुरुषा सारखी मेहनत करू शकत नाही.टाळ्या वाजवून पैसे मागणे आणि त्या बदल्यात आशीर्वाद देणे त्यांना समाजाकडून हिनावले जाते. घालून पाडून, टाकून बोलले जाते आणि ब-याच वेळेस समाजाकडून झिडकारलेही जाते .
आयुष्यभर अपमान व दुःख सहन करणाऱ्या किन्नरांची दुवा लागते. अशी आपल्याकडे समज आहे. म्हणून विवाह समारंभाला व एखाद्याच्या घरी मूल जन्मले तेव्हा किन्नरांना बोलून ओवळणी दिले जाते. एवढी एक गोष्ट सोडता किन्नरांना भिक मागून पोट भरल्या शिवाय गुजरना करणं अशक्य असते.त्यांना रोजगाराचे साधन नसते. एक तर त्यांचे रक्ताचे कुणी नातेवाईक असून नसल्या सारखे असतात. ते त्यांच्याकडे कायमची पाठ फिरवतात. समाजही त्यांना झिडकरतो. त्यांची कुचेष्टाच करत असतो. मग ह्या वेदनादायी किन्नर समाजाने आपले पोट भरायचे कसे? समाजात जगायचे कसे ? भरीत भर म्हणून त्यांचे अज्ञान, रीतीरिवाज ,जोखड व शिक्षणाची अनावस्था.आरोग्याकडे दुर्लक्ष यामुळे बहुतांश किन्नर व्यसनाधीन होतात. त्यांना अनेक आजार जडतात. त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात परवड होऊन जाते.
हजारो वर्षा पासून ही अशी माणसं अतिशय व्यथामय जीवन जगत जगत आलेली आहे. आणि क्रित्येक काही काळाच्या पडद्याआड सुद्धा गेलेले आहेत. या तृतीयपंथीयांची दखल पाहिजे तशी समाजाने घेतलेली नाही. शासन दरबारी सुद्धा पाहिजे तशी दखल यांची घेतली गेलेली नाही. त्यांच्या वेदना कोणी जाणून घेत नाही त,घेतल्या जात नाही. अगर त्यांच्यावर काही सखोल व खोलवर लिहिले सुद्धा गेले नाही.
तथापी तृतीयपंथी किन्नर या समाजातील घटकांमध्ये काही किन्नर तृतीयपंथी हे सामाजिक बांधिलकीतून समाज जाणीवा संपन्न असलेले हरहुन्नरी व हुशार असे आहेत.ते समाजासाठी सकारात्मक पद्धतीने विचार करतात व आपले जीवन त्या पध्दतीने जगतात. समाजाला दिशा देण्याचे काम करतात.

लेखक मारुती खडके यांची “परांगणा” ही तृतीयपंथीयांच्या जीवनातील वेदना ,त्यांचे मुक आक्रांदणे व आयुष्यभर त्यांच्या व्याकुळलेल्या शून्य नजरा त्यांच्या जीवनातील त्यांची होणारी फरफट… त्यांचा वेदनामय जीवन जगत असतानाचा प्रचंड मोठा संघर्ष. खरं म्हणजे, हा अंतर्मनाला पिळून टाकणारा वास्तववादी भाग आहे. वेदनांच्या आश्रुनी भिजून टाकणारा असा हा प्रकार आहे. तो प्रचंड वेदनांनी भरलेला आहे. त्या तृतीयपंथी किन्नर लोकांच्या जीवनातील लाचारी, असहाय्यता, हतबलता, भयग्रस्तता या सगळ्यांची परिनीती म्हणजे, त्यांचं दुःखमय जगणं…. हे अतिशय प्रगल्भपणे मांडलेलं एक सत्य आहे. आणि या समाज वर्गाचे सत्य दर्शवणारा हा खरा अनमोल ठेवा म्हणजे… “परांगणा” ही कादंबरी होय.
लेखक श्री मारुती खडके यांच्या ह्या कादंबरीतील मुख्य पात्रास तीन नावे आहेत. राजू, राजेश्वरी व लक्ष्मीराज

आई-वडिलांच्या घरी जन्म घेतल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊ पर्यंत राजू नाव आहे. हा राजू बारावीला असताना त्याचं मूत्रशयाच्या ठिकाणी थोडसं किरकोळ दुखायला लागलं म्हणून राजूचा बाप त्याला दवाखान्यात घेऊन गेला.डॉक्टरांनी त्याला चेकअप केलं.डॉक्टर राजूला म्हणाले “बाळा थोड्यावेळ बाहेर जा. आम्हाला थोडं बोलायचं आहे !” राजू ओपीडीच्या बाहेर उभा राहिला. डॉक्टर राजूच्या बापाला म्हणाले “तुमच्या मुलाला वेगळाच आजार दिसतोय. माझ्यावर तुम्ही शंभर टक्के विश्वास ठेवू नका .पण तुमचा मुलगा नपुंसक आहे.अजून तुम्ही स्पेशल डॉक्टरांकडे तपासणी करा.
डॉक्टरचे असे बोलणे ऐकल्यावर जन्मापासून आत्तापर्यंत खूप लाडाचा, आवडीचा व प्रेमाचा वाटणारा आई-बापांचा राजू हा मुलगा अचानक बापाला तो नकोसा वाटू लागला आणि एक तिरस्काराची भावना बापाच्या मनावर मुलाबद्दल निर्माण झाली. असा मुलगा माझ्या पोटी जन्मलास कसा ? मी निपुत्रिक राहिलो असतो तरी बरं झालं असतं… उद्या माझे नातेवाईक व समाज मला काय म्हणेल ! तुमच्या पोटी हिजडा जन्माला आला….!
आई – बाप मुलाला तंज्ञ डॉक्टर कडे घेऊन जातात आणि तिथे त्यांची पूर्ण खात्री होते की राजीव हा नपुसक आहे. तेव्हापासून ते आपला लाडक्या मुलाबरोबर तिरस्काराने वागू लागतात. राजूच्या ह्या गोष्टी लक्षात येतात .आई -बाप आपल्या बरोबर तिरस्काराने वागत आहेत. त्याच बरोबर आपल्या चालण्यामध्ये, वागण्यामध्ये व बोलण्यामध्ये काहीसा बदल झालेला आहे याची जाणीव राजूला होत होती आणि राजूच्या चालण्यामुळे ,बोलण्यामुळे कॉलेजमधील मुलं सुद्धा राजूला ऐ छक्या, ऐ हिजडया ,ऐ सिक्स असं म्हणून चिडवत होते. कुणी त्याच्या पाठीवर चापट मारत होते तर कोणी त्याच्या ढुंगणावर हळूच झापड मारत होते .कॉलेजमधले काही टुकार मुलं सततच त्याला त्रास देत होते. तुला एकदा भोंगळं करुन आम्हाला बघायचा आहे. अशा प्रकारचं बोलणे मुलं बोलत होते. राजूला आता हे सर्व सहनशीलतेच्या पलिकडचे वाटत होते. घरी आई -बाप प्रेमाने वागत नाहीत व कॉलेजमध्ये मुलं प्रचंड त्रास देतात. या दुहेरी कोंडमाऱ्या मध्ये राजू सापडलेला होता.तो आपल्या आईला विचारतो. मला काय झाले आहे ! डॉक्टरांने काय सांगितले आहे सांग!
आणि आई सांगते ‘राजू तू नपुंसक आहे’ !
आणि राजू हताश होतो…. काही दिवसापासूनच त्याला थोडे दबक्या आवाजात चाहूल लागली होती की, मी माणसात नाही म्हणून त्याच्या अंतर्मनाच्या भावनांच्या ठिकऱ्या उडाल्या . त्याच्याबद्दल आता कोणालाही माया नाही असे त्याला वाटू लागले . घरी दारी कॉलेजमध्ये सगळीकडेच त्याची अवहेलना होत होती आणि यापुढे होणार आहे. अशा विचारांमध्ये तो कॉलेजमध्ये गेला आणि त्या ठिकाणी कॉलेजच्या उनाड मुलांनी त्याला वर्गामध्ये कोण त्याची हेटाळणी केली. त्याचे कपडे काढले आणि कॉलेजच्या इतर मुलांनी खिडक्या मधून सर्व प्रकार पाहिला. अब्रूची बेअब्रू झाली होती .कॉलेजच्या एका मुलीने पटकन घरी पळत जाऊन ड्रेस आणला आणि तो त्याच्या अंगावर टाकला. नजर चुकीने त्या मुलीने भावाचा ड्रेस समजून स्वतःचाच पंजाबी ड्रेस आणला होता. त्यांनी तो ड्रेस घातला आणि त्या कॉलेजमधून तो बाहेर पडला. मनामध्ये प्रचंड विचाराचं काहूर माजलेलं होतं. आता राजूने मनामध्ये एक संकल्प केला .यापुढे घरी जायचं नाही आणि कॉलेजमध्ये जायचं नाही. आता पाठीमागचे सर्व दोर त्यांन कापून टाकले होते. राजू आता संपला होता.

यापुढे लेखक मारुती खडके यांनी कादंबरीला एक वेगळच वळण दिलेला आहे .इथून पुढचा त्या तृतीयपंथी किन्नाराचा प्रवास आपल्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातो आहे.
तुळशी नावाची किन्नर त्याला भेटते तिच्याशी मन मोकळेपणाने संवाद होतो आणि ती तुळशी नावाची किन्नर त्यास गुरु आईसाहेब यांच्याकडे घेऊन जाते. गुरु आईसाहेब त्यास काही गोष्टी समजावून सांगते. प्रेमाने ममताळू पणे त्याच्याशी बोलते आणि त्यास त्या छत्रालयात त्यांचे “राजेश्वरी” हे नामकरण करुन आपुलकीने ठेवून घेते.
ह्या छत्रालयात आल्या पासून खूप आपुलकीची प्रेमाची वागणूक मिळू लागली. त्याच्याबरोबर असणारे सर्व किन्नर नात्यांच्याही पलिकडे असलेल्या प्रेमाळू नात्याने वागू लागले. त्यांची आई साहेब सांगते, आपली देवाने निर्मिती केली . त्याच बरोबर देवाने नर ,दाणव ,यक्ष, गंधर्व, किन्नर आणि मानव यांनाही निर्माण केले आहे. देवाने आपल्याला टिचभर पोट दिले आहे. त्याची खळगी भरण्यासाठी माणसाला किती लागते. त्यापेक्षा जास्त कुणीही अपेक्षा करायची नाही. माणसाला जागाही साडेतीन हात लागते. तेवढाच विचार करायचा. आवाच्या सव्वा संपत्ती कुणी जमा करायची नाही. आपल्या मागे कुटुंब नाही .आजची बात आज आणि उद्याची बात उद्या. आपल्याला समाजाने दुय्यम स्थान दिले आहे. आपल्याला कोणीही जवळ करत नाही. समाजही नाही व नातेवाईकही जवळ करत नाही. त्यामुळे आपण तटस्थ वागायचे. कोणत्याही व्यक्तीच्या मायाजाळात फसायचे नाही. पैसे आणि कोणत्याही वस्तू साठवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा नाही. सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने वागायचे. आपल्या सर्वचे हे एक कुटूंब समजायचे. एखाद्या किन्नरावर काही अडचण आली तर त्याला मदत करायची. अशा अनेक गोष्टी त्याला तिथे कळाल्याआणि तो आपल्या सहकारी किन्नरांसोबत तिथे त्यांच्या सारखाच राहू लागला. त्यांचे सर्व रितीरिवाजा पाळून त्यांच्या सारखाच दैनंदिन कामही करु लागला. त्याला व त्याच्या सहकार्यांना कुटूंबाने ,समाजाने ज्या पध्दतीने झिडकारले त्या समाजाला व नातेवाईकांना एक चांगला सकारात्मक संदेश आपल्या सुयोग्य वर्तनातून द्यायचा असे त्याने ठरविले.

साडी नेसून किंवा पंजाबी ड्रेस घालून किन्नरांच्या वेषामध्ये त्यांनी समाजासाठी काम करण्याचा भरपूर प्रयत्न केला. पण समाजाने त्याची टिंगल – टवाळीच केली.तेव्हा त्याने एक वेगळी शक्कल लढवली.सामाजिक कार्य करण्यासाठी तो पुरुषां सारखा वेश परिधान करून लक्ष्मीराज या नावाने बाहेर पडून समाजकार्य करु लागला. त्याने अनेक भिकारी लोकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिले. काही भिकाऱ्यांना फुलांचे दुकाने टाकून दिले .काहींना हातगाड्यावर दुकाने थाटून दिले. समाजातील जे रंजले ,गांजलेली गरीब माणसं होती अशा लोकांसाठी तो सततच मदत करू लागला. परंतु ते करत असताना त्याने आपली पूर्णपणे तृतीयपंथी किन्नराची छबी लपवली होती. एवढेच नव्हे तर त्याने प्रत्येक महिन्यातून एकदा रक्तदान करणे सुरू केले. जिवंत असतानाच आपला एक डोळा त्याने एक गरिबी गरजू मुलास दान केला. आपली एक किडनी सुद्धा त्यांने एक मंत्र्याला दान केली होती. आपल्या शरीराच्या पार्श्वभागाचे काही चमडे सुद्धा त्याने दान केले होते. अनेक रंजल्या ,गांजल्यांना त्याने आर्थिक मदतही केली. ज्या आई-वडिलांनी त्याला झिडकारले. त्या आई-वडिलांना सुद्धा तो प्रत्येक महिन्याला पैसे पाठवू लागला. पण हे सर्व करत असतां ना त्याने आपले तृतीयपंथी अस्तित्व पूर्णपणे लपून ठेवले होते.आपले खरे नाव गाव लपवले होते.
आता समाजा मध्ये लक्ष्मीराज ह्या व्यक्ती बाबत ,त्या नावा बाबत जिकडे तिकडे चर्चा सुरू झालेली होती.अगदी राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा सुरू झाली. समाजाच्या वरिष्ठ पातळी पासून ते तळागाळा पर्यंत लोक बोलू लागले होते. त्याची दखल घेतली गेली होती.समाज आता लक्ष्मीराज ह्या व्यक्तीला “देवमाणूस” म्हणू लागला होते .
परंतू, हे सर्व करत आसतांना तो स्वतः हा प्रसिद्धी पासून दूर होता.तथापी समाजाने त्याची दखल तर घेतलीच होती. तथापि शासनाने सुध्दा पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला होता. एकूणच कि न्नारांच्या वाट्याला येणारा संघर्ष हा खूप मोठा आहे ,खूप काही सांगून जाणारा आहे आणि म्हणूनच संघर्ष हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे . हा संघर्ष प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये केलाच पाहिजे. संघर्ष करत असतांना कुठलीही लाज बाळगू नये. पण संघर्ष करत असताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो आहोत.याची जाण ठेवून सामाजिक बांधिलकीतून समाज जाणिवा सुद्धा संपन्न ठेवल्या पाहिजेत. हा मौल्यवान संदेश किन्नारांच्या रुपाने ह्या कादंबरीतून मिळतो.

खरं तर, ह्या कांदबरीची सुरुवात व शेवट खूप काही सांगून जाणारा आहे. किन्नारांचे आयुष्य समोर आणणे हा लेखकाचा उद्देश नसून विनाकारण किन्नारांना कुत्सित भावनेने टाळले जाते. समाजामध्ये त्यांची मानहानी होते. शासन दरबारी सुद्धा त्यांची पाहिजे तशी दखल घेतली जात नाही .समाजाने त्यांना आपले म्हणावे. त्यांच्या कडे पाहण्याचा सर्व स्तरातून दृष्टिकोन बदलावा. आज अनेक संस्था किन्नारांच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात काम करत असलेल्या दिसून येतात. तथापि शासकीय स्तरावर किन्नारांच्या संदर्भामध्ये त्यांच्या संवर्धनाच्या अनुषंगाने स्पेशल आदेश निघावेत. जेणेकरून सर्व स्तरावरील मुलभूत अधिकार त्यांना मिळतील.ह्या अनुषंगाने समाजाच्या मन व मेंदू मध्ये प्रकाश पडावा .व माणूस म्हणुनच समाजाने त्यांना स्विकारावे .हा लेखकाचा खरा उद्देश व उदात्त हेतू ह्या कादंबरी मध्ये ठळकपणे दिसून येतो आहे.
शब्दगंध प्रकाशन,अहिल्यानगर यांनी काढलेल्या ह्या कादंबरीची बांधणी खूप सुबक , नीटनेटकी व आकर्षक असून
कादंबरीचे मुखपृष्ठ खूपच बोलके व कादंबरीचे अंतरंग सांगून जाणारे आहे. ही कादंबरी वाचकांना समाजातील उपेक्षित असलेल्या तृतीय पंथीयां कडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचे निश्चितच बळ देईल.
लेखक श्री मारुती खडके चिचोंडी पाटील . यांच्या भविष्य काळातील आगामी लेखानास हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

सुभाष सोनवणे,
साहित्यिक/व्याख्याते
अहिल्यानगर, मो. ९८६०१५९४९१

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!