कडा/ राजू म्हस्के:- दि.२५ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजता आष्टी येथे जिजाऊ मंगल कार्यालयात मराठा आंदोलक क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी व पुढील रोड मॅप ठरविण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने बैठक घेण्यात आली या बैठकीत जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आजी माजी आमदार खासदार व पुढाऱ्यांना ग्रामपंचायतीने गावबंदी चे ठराव घेऊन साखळी उपोषण करीत असल्याचे आष्टी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले आहे
या विषयी माहिती अशी कि, मराठा आरक्षणावर घटनात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने ४० दिवसांचा वेळ मागून घेऊन मराठा आरक्षण मागणी साठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याची विनंती सरकारने केली होती त्या प्रमाणे त्यांनी उपोषण सोडले, त्या नंतर वैद्यकीय उपचार घेऊन ते महाराष्ट्राच्या काही जिल्ह्याच्या दौरे करून सरकारला जागे करण्यासाठी सभा घेण्यात आली परंतु निद्रिस्त सरकारला अध्याप जाग आली नाही त्यामुळे क्रांती सूर्य मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा देण्यासाठी २६ तारखेपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक आष्टी व कडा येथे महेश मंदिर याठिकाणी साखळी उपोषण करण्यात येणार आहे असे समजते, मराठा समाजाच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधवानी बैठक घेऊन साखळी उपोषण करणार असून जर लवकरात लवकर सरकारने मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणार आरक्षण दिलं नाही तर या पुढील रोड मॅप काय असेल याची रणनीती २८ तारखेला ठरवण्यात येईल असे सकल मराठा समाजाच्या बैठकीत ठरवण्यात आले. दि.१४ ऑक्टोबर रोजी आंतरवाली येथे विराट सभा घेत जरांगे पाटलांनी सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. शिवाय जरांगे पाटलांच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरकारला दिलेल्या मुदतीत आरक्षण मिळायलाच हवे, अशी भूमिका घेतली होती. पण तरीही सरकार मराठा आरक्षणासाठी गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसून आले. त्यामुळेच त्यांनी पुन्हा आमरण उपोषणाचे शस्त्र उपासले आहे. त्यांचे पहिले आमरण उपोषण १७ दिवस चालले होते मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील पुन्हा आमरण उपोषणास सुरुवात करत आहेत. या उपोषणात ते अन्न, पाणी, सलाईन काहीच घेणार नाही असे कठोर उपोषण करणार असून जीवाची बाजू लावून ही लढाई लढणार असल्याचे सांगितले. सरकारने क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील व मराठा समाजाला सांगितले होते की, तुम्ही आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला टिकणारे आरक्षण देऊ. सरकारने आपल्याकडे ३० दिवसच मागितले होते. आज एक्केचाळीसवा दिवस आहे. या ४० दिवसांत सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आपल्यावर उपोषणाची वेळ आली आहे. सरकारने मराठा समाजाची दिशाभूल केली. सरकारने समिती नेमली या समितीने १५ दिवस काहीच केले नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेऊ, असे आश्वासन सरकारने दिले होते. ते गुन्हेही अद्याप मागे घेतले नाही. सारथी संस्थेबाबत विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सरकारने अद्याप काहीच केले नाही. सरकारने दिशाभूल केली आहे. मराठा समाजाला आवाहन करताना म्हणाले की, मराठा समाजाने शांततेत हे आंदोलन करायचे आहे. कुठेही आंदोलन उग्र, हिंसक होणार नाही, याची काळजी घ्यावी. कुणीही आरक्षणासाठी आत्महत्ये सारखे टोकाचे पाऊल उचलू नये. राज्यभरात ठिकठिकाणी साखळी उपोषण करावे. निद्रिस्त सरकारला जागे करण्यासाठी कॅनल मार्च काढण्यात येणार आहे तसेच आजी माजी आमदार खासदार, पुढारी नेते यांना गावबंदी करावी असे ठराव घेण्यात आले आहेत. मात्र, हे करताना वाद होणार नाही याची काळजी घ्यावी. आजी माजी आमदार खासदार व मंत्री यांना गावबंदी केल्यानंतरही जर गावात आले त्यांना शांतपणे आपली भूमिका समजावून सांगून परतण्यास सांगावे. नेत्यांच्या गावबंदी चे ठराव आष्टी तालुक्यातील अनेक गावातील ग्रामपंचायतीनी घेतली असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली.या वेळी आष्टी तालुक्यातील असंख्य मराठा बांधव उपस्थित होते.