श्रीरामपूर (प्रतिनिधी ): “महिलांना ज्ञान,कौशल्ये,संसाधने आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता देणे म्हणजे महिला सक्षमीकरण असून त्यांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे,तरच ख-या अर्थाने समाज प्रगतीपथावर जावू शकतो.” असे प्रतिपादन शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या संस्थापक सदस्या, कवयित्री शर्मिला गोसावी यांनी केले.
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,अशोकनगर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सौ.गोसावी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.मृणालिनी मुकुंडे या होत्या.
पुढे बोलताना शर्मिला गोसावी म्हणाल्या कि,आजच्या धावपळीच्या युगामध्ये स्श्रि पुरुष समानता असून दोघांनीही आपल्या परीने घर उभा राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, लैंगिक असमानतेला आव्हान देणे आवश्यक असून सुखी समृद्धी समाज निर्माण होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.आपल्या आवडत्या विषयात काम केल्यास निश्चित केलेले ध्येय गाठता येते.महिलांनी स्वत:ला कमकुवत न समजता समर्थपणे पुढे येणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मनोगतात सौ.मृणालिनी मुकुंडे म्हणाल्या कि,महिला सशक्तीकरण महत्त्वाचे असून महिलांना तशी संधी देणे गरजेचे आहे.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सुनीता गायकवाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून जागतिक महिला दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्रगतीपथावर असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका शर्मिला रणधीर यांच्यासह अशोक महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका आणि विद्यार्थीनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी सूत्रसंचालन प्रा.संगीता खंडिझोड यांनी केले.अध्यक्षीय सुचना प्रा.मोहिनी आल्हाट यांनी केली तर अनुमोदन प्रा.पद्मश्री पवार यांनी दिले. शेवटी प्रा.राणी पटारे यांनी आभार मानले.