पाथर्डी प्रतिनिधी :- पाथर्डी शहरात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच शहरातील चौंडेश्वरी सांस्कृतिक भवन या ठिकाणी स्वस्तिक महिला मंडळाचे वतीने महिला फुड फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रम, महीला सन्मान सोहळा व आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या एकदिवसीय कार्यक्रमांमध्ये शहरामधील महिलांनी विविध प्रकारच्या वस्तू व खाद्यपदार्थाचे सुमारे २० स्टॉल लावले होते. या महिला आनंद मेळाव्यामध्ये सुमारे तीनशेपेक्षा जास्त महिलांनी सहभाग नोंदविला. यावेळी उपस्थित प्रत्येक सहभागी महिलांना भेटवस्तू देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत महीलांसाठी रांगोळी स्पर्धा, पारंपारिक वेशभूषा तसेच नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी पाथर्डी शहरातील तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला त्यामध्ये प्रामुख्याने अकोले या छोट्या गावातील रिया थोरात या मुलीने घरच्या अत्यंत खडतर व हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत आयकर सहाय्यक आयुक्तपदी निवड झाल्याने व 21 वर्ष तुटपुंज्या मानधनावर समाजसेवा करत आरोग्य सेविका म्हणून काम करणाऱ्या रागिणी उदारे तसेच जुडो कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट प्राविण्य मिळवणाऱ्या आदिती राजगुरू आणि अस्मिता साठे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी महीलांसाठी विविध प्रकारचे स्पर्धात्मक खेळ घेऊन प्रथम द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या महिलांसह सहभागी स्पर्धकांना पत्रकारांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. पायोनियर कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विठ्ठल जगताप यांनी आरोग्य विषयावर आहारातील सकसपणाचे महत्व पटवून दिले. आरोग्य विमा संबंधित माहिती रुक्मिणी उबाळे यांनी दिली. यावेळी माजी नगरसेवक अनिल बोरूडे, पायोनियर कंपनीचे विठ्ठल जगताप,सामाजिक कार्यकर्ते अरविंद सोनटक्के, शिव प्रहारचे सोमनाथ माने, विमा प्रतिनिधी ज्ञानेश्वर उबाळे, प्रा सुभाष हंडाळ, स्वस्तिक मंडळाचे सचिव संदिप काटे, होमगार्ड तालुका समादेशक राजेंद्र उदारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वस्तिक महिला ग्रुपचे अध्यक्ष सपना काटे तसेच आरती निऱ्हाळी, अर्चना जेधे, वैशाली कुलकर्णी, प्रीती बाहेती, कल्याणी हंपी, दिपाली कुलकर्णी, सविता मुळे, आदी महिलांनी विशेष परिश्रम घेतले.