अहमदनगर,(प्रतिनिधी)- गेल्या ३० वर्षापासून नाट्य चळवळीमध्ये सप्तरंग थिएटर्सने आपले वैशिष्टयपूर्ण स्थान व लौकीक निर्माण केला आहे. अनेक रंगकर्मींना नाटयकला जोपासण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याचे काम सप्तरंगच्या माध्यमातून होत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. यामुळे जिल्ह्याभरात नाट्यकर्मी तयार होत आहेत असे प्रतिपादन वसंत पेंटसचे संचालक वसंतलाल बोरा यांनी व्यक्त केले.
सप्तरंग संस्था व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेसाठी बसवण्यात येणाऱ्या नाटकांच्या संहिताचे पूजन नुकतेच करण्यात आले,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, सप्तरंगचे अध्यक्ष डॉ. श्याम शिंदे, नाटय दिग्दर्शक संजय लोळगे व इतर मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या राज्य नाटय स्पर्धा प्राथमिक फेरीला दि. २० नोव्हेंबर पासून सुरुवात होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६२ वर्षापासून या नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
राज्य नाट्य स्पर्धेसाठी अनेक नाट्य संघ तयारीला लागले आहेत. गेली ३७ वर्षापासून अविरतपणे नाट्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सप्तरंग थिएटर्सने विजयादशमीच्या मुहूर्तावर संहितेचे पूजन केले. प्रारंभी वसंत पेंट्सचे संचालक वसंतलाल बोरा, शब्दगंध चे सचिव सुनील गोसावी यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. त्यानंतर रंगकर्मी रितेश साळुंके यांना श्रद्धांजली देण्यात आली.
यावेळी डॉ.श्याम शिंदे, शर्मिला गोसावी, संजय लोळगे, डॉ.सुनिल कात्रे, रियाज पठाण, सुधीर देशपांडे, सागर अधापुरे, पुनम कदम, अनिकेत देऊळगावकर, उज्वल कुलकर्णी, सागर खिस्ती, निलेश पेद्राम, वैष्णवी, किरण दीडवानिया, अक्षय कुरकुटे, स्वानंदी भारताल, प्रेम लोखंडे, कल्पेश शिंदे, मयूर खोत, आकांक्षा शिंदे, वर्षा भोईटे , उज्वल कुलकर्णी आदी रंगकर्मी उपस्थित होते.
यावर्षी सप्तरंगच्या वतीने दोन नाटके सादर केली जाणार आहेत. सप्तरंग थिएटर्स व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने ही नाटकं सादर होणार आहेत. दिग्दर्शन अनुक्रमे डॉ. श्याम शिंदे आणि संजय लोळगे करणार आहेत.
अहमदनगर केंद्रावर २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत प्राथमिक फेरी रंगणार आहे. राज्यातील एकूण १९ शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. सांगली, सोलापूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर, रत्नागिरी आणि पुणे तसेच महाराष्ट्राबाहेर गोवा सेंटरमध्ये देखील ही स्पर्धा पार पडणार आहे.
अहमदनगर मधील माऊली सभागृहात या राज्यनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येतं असते. अहमदनगर मधील या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण २२ नाट्य संस्थांचा सहभाग आहे.
शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, रंगकर्मी रियाज पठाण यांनी रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री स्वानंदी भारताल हिने आभार प्रदर्शन केले.