पाथर्डी प्रतिनिधी :- यंदाचा मोहटा देवी चा नवरात्र उत्सव महत्त्वपूर्ण ठरला असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येऊनही एकही गुन्हा घडला नाही .पोलीस दलासह विविध सुरक्षा यंत्रणांनी सेवाभाव जपत बंदोबस्ताचे काम चोखपणे केले. जिल्ह्यातील नवरात्रोत्सवाचा सर्वात मोठा उत्सव असूनही सुरक्षा यंत्रणा चे काम उल्लेखनीय ठरले ,असे मत जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी व्यक्त केले. शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी सायंकाळी ओला यांनी मोहटा देवस्थानला भेट देऊन संपूर्ण सुरक्षा यंत्रणा, दर्शन रांग, सीसीटीव्ही यंत्रणा, बिगर गणवेशातील कर्मचारी फिरते पथक, गाभारा नियोजन ,घटी बसलेल्या महिलांच्या सुरक्षा व निवास व्यवस्थेची पाहणी केली. महाप्रसाद व्यवस्था, वाहतूक नियोजन अशा कामांची पाहणी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप, उपनिरीक्षक रामेश्वर कायंदे, आदींसह विविध अधिकारी उपस्थित होते. विश्वस्त अक्षय गोसावी व राकेश ओला यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. विश्वस्त बाळासाहेब दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे,एड.कल्याण बडे यांनी स्वागत केले. जिल्हा पोलीस दलातर्फे राकेश ओला सुनील पाटील व संतोष मुटकुळे या अधिकाऱ्यांच्या हस्ते देवीला मानाची साडी, ओटीचे साहित्य, प्रसाद, कुंकू अर्पण करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी ओला यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, पंधरा दिवसांचा जिल्ह्यातील सर्वात मोठा बंदोबस्त मोहटा देवीचा असतो. विश्वस्त, ग्रामस्थ, स्थानिक प्रशासन, सर्व कर्मचारी, आदींनी एकत्रितपणे श्रद्धायुक्त अंतकरणाने काम करून भाविकांची सेवा केली. निष्ठापूर्वक केलेले काम हीच देवीची खरी सेवा ठरते. नवरात्रोत्सवामध्ये भाविक घराबाहेर पडताना पूर्णपणे सुरक्षा यंत्रणांवर विश्वास ठेवून मंदिरापर्यंत येतो. अनेक भाविकांनी पोलीस दलाच्या यात्रा कालावधीतील कामगिरी बाबत समाधान व्यक्त केले. असा विश्वास हेच पोलीस दलाचे मनोबल उंचावणारे ठरते. आपण स्थानिक यंत्रणेकडून दररोज यात्रा कामकाजाबाबत आढावा घेतला, असे ओला म्हणाले .पोलीस दलातर्फे देवीचा प्रथमच मानपान करण्यात आल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले .