पाथर्डी प्रतिनिधी :- मोहटादेवीला राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात नवरात्रोत्सव काळापासून व्हीआयपी सह इतरांना गाभारा दर्शन बंदी केल्याने भाविकांनी त्याचे मनापासून स्वागत केले. या निर्णयामुळे दर्शन सुविधा सुरळीत पार पडली. यात्रा नियोजन समितीच्या निर्णयाला यश आले यावर्षीपासून अमलात आणलेल्या या बदलाचे परिणाम चांगले दिसून आले जिल्हा प्रशासनाने आवश्यक सुविधा पुरवल्या अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या माळीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थानला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. देवीची महापूजा करून स्थानिक यंत्रणांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार श्याम वाडकर, गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, पालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, विश्वस्त शशिकांत दहिफळे, भीमराव खाडे आदी उपस्थित होते.
मान. जिल्हाधिकाऱ्यांनी दर्शन रांगेसह पूजास्थान, पिण्याचे पाणी, आरोग्यवस्थेची पाहणी करत श्री यंत्राची माहिती घेतली. मुख्य पुरोहित भूषणदेवा साकरे ,भास्कर देशपांडे, बाळासाहेब क्षिरसागर यांनी महापूजेचे पौरोहित्य केले. सालीमठ म्हणाले, उन्हाची तीव्रता वाढल्याने पहिल्या टप्प्यात भाविकांची गर्दी कमी असली तरी दुसऱ्या टप्प्यात गर्दी निश्चित वाढेल. सर्व यंत्रणा सज्ज असून काही अडचण येणार नाही. जिल्हा प्रशासनाच्या वतीने टँकर उपलब्ध करून दिल्याने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची चांगली सोय झाली. पारंपारिक उत्साह जपत भाविकांनी शारदीय नवरात्रोत्सव आनंदात पार पाडवा. यात्रा नियोजन बैठकीत ठरल्याप्रमाणे स्थानिक प्रशासन, देवस्थान समिती, सुरक्षा यंत्रणा, पोलीस दल ,यासह विविध सेवाभावी संस्था अशा सर्वच यंत्रणांनी सेवाभाव जपत काम केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले .