पाथर्डी प्रतिनिधी:-
नवरात्रोत्सव म्हणजे स्त्रीने तिच्यात असलेल्या स्त्रीत्वाच्या शक्तीचा केलेला जागर असून स्त्रियांच्या सृजनशीलतेला जगाने केलेले नमन होय. स्त्रीला तिच्यातील बलस्थानांची प्रचिती यावी, स्त्रीत्वाच्या सीमेत राहूनही तिने आकाशाला गवसणी घालावी यासाठी स्रीशक्तीचे महात्म्य सांगणारा उत्सव म्हणून नवरात्रोत्सवाकडे पाहिले जाते असे प्रतिपादन मैत्रेयी ग्रुपच्या अध्यक्षा कविताताई आव्हाड यांनी केले. त्या येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठान व मैत्रेयी ग्रुप आयोजित ‘जागर स्रीशक्तीचा’ कार्यक्रमात बोलत होत्या. व्यासपीठावर दिपालीताई बंग, प्रमुख पाहुण्या प्रबोधिनी पठाडे व समृद्धी सुर्वे, निशा खाटेर, रोशनी कांकरिया, प्रीती भंडारी, ज्योती मंत्री, आशा देवढे, आरती गर्जे, वंदना पालवे, नंदाताई आव्हाड, मुख्याध्यापक अनुजा कुलकर्णी उपस्थित होत्या.
कविताताई म्हणाल्या, स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते. भारतात साजरे होणारे सर्व सण स्रीशक्तीला अनुसरून असून सर्व कार्यशक्ती या स्रीलिंगी आहेत. यामध्ये सरस्वती ही बुद्धीची, लक्ष्मी ही संपत्तीची तर दुर्गा ही उत्क्रांतीची देवता आहे. समाजाच्या जडणघडणीत स्रीयांचे मोठे योगदान आहे. असे असले तरी आजच्या आधुनिक युगात स्रीया सुरक्षित नाहीत. नेहमी त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना रूजत असते. याबाबत आता स्रीयांनीच स्रीयांमध्ये जागर करण्याची गरज आहे. आज प्रत्येक क्षेत्रात म्हणजे देशाचे रक्षण कार्य, अभियंता, डॉक्टर, वकील व शिक्षण यात स्रीया मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवित असतांना एक उत्तम गृहिणी म्हणूनही आपले कर्तव्य पार पाडीत आहेत. स्त्रीला देण्यासाठी सर्वात मोलाची भेट म्हणजे तिचा सन्मान, आणि हा सन्मान जर प्रत्येक स्तरातील स्त्रीला दिला गेला तर तिचे मानवी हक्क तिला अनुभवता येईल अशी समाजव्यवस्था निर्माण होईल आणि हाच खरा स्रीशक्तीचा जागर असेल असे त्या शेवटी म्हणाल्या.
यावेळी प्रबोधिनी पठाडे व समृद्धी सुर्वे यांनी स्रीशक्ती, मुलगी, मोबाईलचे युग आले, बाप मला कधी समाजालाच नाही या कविता सादर केल्या. महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वेशभूषा, प्रश्नमंजुषा, व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विजयी विद्यार्थीनीना मैत्रेयी ग्रुप तर्फे आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आशा पालवे, सुत्रसंचालन प्रा. सुरेखा चेमटे तर आभार प्रा. लीना राठी यांनी मानले.