नवी दिल्ली: कारचे टायर खराब झाले की त्यात नवीन टायर बसवले जातात. तुम्हीही तुमच्या कार किंवा बाईकचे टायर कधी ना कधी बदलले असतीलच. पण, नवीन टायरवर काट्यासारखी रबराची छोटी गोष्ट का असते हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का?
या रबर काट्यांना स्पाइक, टायर निब्स, गेट मार्क्स किंवा निप्पर्स असंही म्हणतात. हे स्पाइक्स टायर्सवर का असतात आणि त्यांचं कार्य काय आहे, याची माहिती याठिकाणी देण्यात आली आहे.
टायरवरील रबर स्पाइक्स टायरच्या उत्पादनादरम्यान तयार केले जातात. टायर बनवण्यासाठी, टायरच्या साच्यात लिक्विड रबर ओतलं जातं. साच्यातील सर्व कोपऱ्यांवर रबर पूर्णपणे पसरवण्यासाठी हवेचा दाब वापरला जातो. अशा स्थितीत उष्णता आणि हवा एकत्र होते आणि त्यामुळे टायरच्या साच्यामध्ये हवेचे फुगे तयार होतात. परिणामी टायरची गुणवत्ता खराब होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत प्रेशरच्या सहाय्यानं हवा बाहेर काढली जाते.
हवेच्या दाबानं तयार होतात रबरी स्पाइक्स
रबर साच्याच्या सगळ्याभागात व्यवस्थित गेलं असल्याची खात्री करण्यासाठी हवेचा दाब वापरला जातो. या दाबामुळे रबर छोट्या छिद्रांमधून बाहेर पडतं. थंड झाल्यावर छिद्रातून बाहेर पडलेलं रबर काट्यासारखा आकार घेतं. टायर मोल्डमधून बाहेर काढल्यानंतरही हे छोटे रबरी स्पाइक्स टायरला चिकटलेले राहतात. कंपनी त्यांना काढत नाही. कारण, यावरून टायर नवीन असून त्याचा वापर केला नसल्याचं लक्षात येतं.
टायर स्पाइक्स काढले जाऊ शकतात?
खरं तर टायरवर या काट्यांची गरज नसते. बरेच लोक नवीन टायर घेतल्यानंतर ते काढून टाकतात. या स्पाइक्सची उपस्थिती किंवा अनुपस्थिती कारच्या मायलेज किंवा कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम करत नाही. त्यांना काढून टाकण्याचं कोणतंही व्यावहारिक कारण नाही. हे स्पाइक्स ठेवायचे की नाही हे पूर्णपणे तुमच्या पसंतीवर अवलंबून आहे. जर तुम्हाला हे काढायचे असतील तर त्यांना हातानं ओढून काढून टाकणं हाच उत्तम मार्ग आहे. हे स्पाइक्स काढण्यासाठी ब्लेड किंवा कात्रीसारख्या तीक्ष्ण वस्तू वापरू नये कारण त्यामुळे टायर खराब होण्याची शक्यता असते. जर तुम्ही स्पाइक्स तसेच ठेवले तर टायर जुना झाल्यानंतर हे आपोआप निघून जातात.
कार किंवा बाईकचे टायर अतिशय महत्त्वाचे असतात. त्यांची व्यवस्थित देखभाल करणं गरजेचं आहे. कारच्या टायरचं वय सहसा त्याच्या वापरावर अवलंबून असतं, कार टायरच्या सरासरी वयाबद्दल सांगायचं झालं तर, आपण 30 हजार ते 50 हजार किलोमीटरनंतर टायर बदलला पाहिजे. नाहीतर गाडीच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो.