पाकिस्तानविरुद्ध सुसाट फलंदाजी करणाऱया कर्णधार रोहित शर्माने रस्त्यावरही आपण सुसाट असल्याचे दाखवून सर्वांना धक्का दिला आहे. एकीकडे अतिवेगाने कार चालवताना ऋषभ पंतच्या कारला झालेल्या अपघाताच्या जखमा ताज्या असताना रोहित शर्मासारख्या जबाबदारी व्यक्तीने ताशी 200 च्या वेगाने कार चालवून आपला बेजबाबदारपणा दाखवून दिला आहे.
सध्या वन डे वर्ल्ड कप ही अत्यंत महत्त्वाची स्पर्धा सुरू असताना रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर थेट हेलिकॉप्टरने मुंबई गाठली आणि दोन दिवस आपल्या कुटुंबासमवेत काढले. मग पुण्यात होणाऱया बांगलादेशविरुद्धच्या सामन्यासाठी टीमबरोबर बसने किंवा हेलिकॉप्टरने न जाता त्याने आपल्या लम्बोर्गिनीसह प्रवास करण्याचा निर्णय घेतला. त्याने कारने प्रवास करण्यापर्यंतचा निर्णय योग्य होता, पण त्याने अतिवेगाने कार चालविण्याचा प्रकार केला. वेगाच्या प्रेमात असलेल्या रोहितने मुंबई-पुणे एक्प्रेस वेवर आपल्या जिवाची पर्वा न करता ताशी 200 पेक्षा अधिक वेगाने कार चालवली. या अतिवेगामुळे त्याचे एकदा-दोनदा नव्हे तर तीनदा अतिवेगासाठी ऑनलाइन दंड ठोठावण्यात आला आहे.
रोहित संघाबरोबर का नाही?
हे क्रिकेटचे युद्ध आहे. आपला संघ रोहितमुळे चांगल्या स्थितीत आहे. पण विजयानंतर रोहित संघाबरोबर का नाही? वर्ल्ड कपचे मिशन सुरू असताना खेळाडूंना परस्पर घरी जाऊ देण्याची ही पद्धत योग्य नव्हे. किमान वर्ल्ड कप संपेपर्यंत सर्व खेळाडूंनी एकत्र राहायला हवे, जास्तीत जास्त सराव करायला हवा. हिंदुस्थानी संघाने एकत्रितच प्रवास करायला हवा. मग तो हवाई असो किंवा जमिनीवरचा. अशी बेदरकारपणे कार चालवणाऱया रोहितला आणि संघातील कोणत्याही सदस्याला वर्ल्ड कप संपेपर्यंत कार चालवण्याची परवानगी दिली जाऊ नये, अशी विनंती हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींनी बीसीसीआयकडे केली आहे.
तीन खेळाडूंनीच केला सराव!
बांगलादेशविरुद्धच्या लढतीपूर्वी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर बुधवारी टीम इंडियाचा संपूर्ण संघ दिसला नाही. बरेच खेळाडू संघासोबत नव्हते. शुबमन गिल, ईशान किशन व रवींद्र जाडेजा या तीनच खेळाडूंनी आज सराव सत्रात भाग घेतला. विजयाची लय कायम राखण्यासाठी सर्व खेळाडूंनी सोबत असायला हवे. अन्यथा संघाची घडी विस्कटण्यास वेळ लागणार नाही.