spot_img
spot_img

शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त कोमल वाकळे हीचे बाबुजी आव्हाड महाविद्यालयात जल्लोषात स्वागत

पाथर्डी (प्रतिनिधी) :- बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची वेटलिफ्टिंग खेळाडू कोमल वाकळे हिला नुकताच महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार २०२२-२३ जाहीर झाला आहे. कोमलने वेटलिफ्टिंग सारख्या मर्दानी क्रीडा प्रकारात राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत अनेक सुवर्णपदके मिळवून अहिल्यानगर जिल्ह्याचा तसेच महाराष्ट्र राज्याचा लौकिक देशपातळीवर गाजवला आहे. शिवछत्रपती पुरस्कार मिळवणारी कोमल बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची पहिली तर वेटलिफ्टिंग क्रीडा प्रकारात हा पुरस्कार मिळवणारीअहिल्यानगर जिल्ह्याची पहिली खेळाडू आहे. कोमलने नॅशनल गेम्स मध्ये २ सुवर्णपदक सीनियर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत ३ सुवर्ण, ४ रौप्य व १ कांस्य पदक, अस्मिता खेलो इंडिया स्पर्धेत २ सुवर्ण १ रौप्य पदक मिळवले आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत १ सुवर्ण व २ रौप्य पदक व राज्यस्तरीय स्पर्धेत ९ सुवर्ण पदक मिळविले आहे. कोमल ही महाविद्यालयाच्या वेटलिफ्टिंग सेंटरवर मागील ४ वर्षापासून क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी महाविद्यालयात खेळाडूंना क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून या सुविधांमुळे कोमलला आज हे यश मिळाले आहे. पुरस्कार जाहीर होतात कोमलचे महाविद्यालयात जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी फटाक्याच्या आतिषबाजीत व ढोल ताशाच्या गजरात पुष्पवृष्टी करत तिची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे, कोमलचे मार्गदर्शक डॉ. विजय देशमुख , प्रा. सचिन शिरसाट, डॉ. अशोक कानडे, तिचे पालक, पत्रकार व महाविद्यालयाचा सर्व स्टाफ, आणि विद्यार्थी उपस्थितीत होते. यावेळी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत व पुणे येथे झालेल्या विभागीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!