आष्टी (प्रतिनिधी) हंगाम २०२४-२५ मध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत माजीमंत्री सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नाने नाफेड च्यावतीने आष्टी तालुक्यातील सोयाबीन, मूग,उडीद उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती कडा येथे शासकीय खरेदी केंद्रावर आवश्यक त्या कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणी सुरू झाली असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे .
कडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी मंत्री सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नाने जामगाव सेवा सोसायटीला शासकीय हमीभाव खरेदी केंद्रांस मंजुरी मिळाली आहे.शेतकऱ्यांनी सातबारा,आधारकार्ड,बँक पासबुक,ऑनलाइन पिकपेरा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह प्रत्यक्ष येऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. सध्या खाजगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावाने माल खरेदी करत असून शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन ४८९२,मुग ८६८२,तर उडीद ७४०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळणार असून शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सभापती रमजान तांबोळी यांनी केले आहे.मुग व उडीद खरेदीचा कालावधी ७ जानेवारी २०२५ तर सोयाबीन खरेदीचा कालावधी १२ जानेवारी २०२५ पर्यंत असणार आहे.