spot_img
spot_img

मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा अभियानात जि.प.प्रा.केंद्रशाळा तालुक्यात प्रथम

पाथर्डी (प्रतिनिधी):- ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ टप्पा २ उपक्रमा अंतर्गत शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या अभियानात शहरातील पीएमश्री जि.प. प्राथमिक शाळेने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळा, वर्ग सजावट, क्रीडा सुविधा, आर्थिक साक्षरता, विद्यार्थी गुणवत्ता, स्वछता, आरोग्य, भौतिक सुविधा आदी मुद्यांवरील विविध बाबींच्या उपक्रमाच्या गुणांकनात समावेश होता. यासाठी १५० गुण निर्धारित होते. जि.प. शिक्षण विभाग अंतर्गत केंद्र, जिल्हा समीतीने मूल्यांकन केले. तपासणी पथक प्रमुख उपशिक्षणाधिकारी मीना शिवगुंडे, अधिव्याख्याता मुकुंद दहिफळे, शिक्षण विस्ताराधिकारी शैलेजा राऊळ व बी.के. साठे यांनी शाळेची पाहणी करून विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले.

या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग असून अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा तुपे यांनी अनेक तज्ञांचे मार्गदर्शन घेत व सहकारी शिक्षिका यांच्या सहकार्याने आपल्या संकल्पनेतून विविध उपक्रम, योजना व सुधारणा करत शाळेत आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत‌. पीएमश्रीच्या व इतर काही फंडातून शाळेत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. आकर्षक रंग, शाळेच्या दर्शनी भागातील रंगीत फुललेले वृक्ष, दुतर्फा शोभिवंत, फुलझाडे, हिरवेगार लॉन, तैलरंगातील शैक्षणिक मजकुराने सजवलेली बाल स्नेही शालेय भिंती, डिजिटल शैक्षणिक फलक, परसबाग, ठिबकद्वारे सर्व झाडांसाठी केलेले जलव्यवस्थापन, संगणक साक्षरता, क्रिडा साहित्य, वाचनीय पुस्तके, आदी सुविधा उपलब्ध करत मुख्याध्यापिका नंदा तुपे व सहशिक्षिका ज्योती जाधव, भावना देवरे, शोभा फुंदे, वैशाली जायभाये, सुरेखा बडे, मनिषा फटांगरे यांनी पालकांचा सहभाग घेऊन हे यश प्राप्त केले. येथे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात येते त्यामध्ये बाजार भेट, तज्ञांचे मार्गदर्शन, मुल्यवर्धीत शिक्षण, संस्कार युक्त शिक्षण, स्वावलंबी शिक्षण, दप्तरमुक्त एक दिवस, पुस्तक प्रदर्शन वाचन महोत्सव, स्वच्छता, पर्यावरणपुरक वस्तू व मुर्ती कार्यशाळा, प्रासंगिक सणोत्सव, बचतीचे महत्त्व आदी उपक्रम राबविण्यात येतात. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच आहाराकडे ही विशेष लक्ष ठेवून परिपाठात सकस आहाराचे ज्ञान, शालेय पोषण आहार, फळवाटप, सकस आहार यांचे ही सुंदर नियोजन केले आहे. शाळेने विविध स्पर्धा परीक्षा, शालेय क्रिडा स्पर्धा, विविध गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, लेखन, वक्तृत्व स्पर्धा याचे आयोजन करून विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा दिली आहे.
विद्यार्थ्यांना दिला जाणारा पुरक आहार, हिरव्यागार परसबागेतील भाजीपाला वापरून बनवला जाणारा सकस पोषण आहार, आखलेली प्रशस्त क्रिडांगणे, जैविक खतनिर्मितीसाठी गांडूळ खत प्रकल्प, स्मार्ट इंटरएक्टीव्ह बोर्डच्या मदतीने सुरु असलेले विद्यार्थ्यांचे तंत्रस्नेही अध्यापन अशा सर्व बाबींचा यामध्ये विचार केला जातो.
शाळेच्या वाटचालीमध्ये गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, विस्तार अधिकारी रामनाथ कराड, केंद्रप्रमुख बाबा गोसावी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. असे शेवटी तुपे म्हणाल्या.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!