पाथर्डी(प्रतिनिधी): शालेय स्तरावर शिक्षण घेत असतांना मुलांनी आपल्या मौखिक आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे तसेच आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योग साधना अतिशय महत्त्वाची असल्याचे मत डॉ.ऋषिकेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त श्री तिलोक जैन विद्यालयात शिक्षण सप्ताहाच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थी म्हणून ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पहावेत आणि ती पूर्ण करण्यासाठी वेळेचा सदुपयोग करावा. संतुलित आहार घेणं आणि योगासन प्राणायाम करणे हे शरीर सुदृढ करण्याचे महत्त्वाचे दुवे आहेत. श्री तिलोक जैन विद्यालय अनेक पिढ्यांचे ऋणानुबंध जपण्याचे संस्कार केंद्र आहे. त्याचबरोबर मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी विद्यालयात संगीत साधनेची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घेणे महत्त्वाचे आहे.बाल वयातच दातांची काळजी घेणे, त्यांची स्वच्छता राखणे आदी बाबतचे मार्गदर्शन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
तसेच सकाळच्या सत्रात शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त कला शिक्षक श्री सुरेश शहाणे यांनीही विद्यार्थ्यांना शिस्त,चांगल्या सवयी, कला आणि क्रीडा शिक्षणाचे महत्व याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोक दौंड यांनी केले. पर्यवेक्षक अजय भंडारी यांनी आभार मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल पानखडे यांनी केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनी आर्या लाड व श्रेया तुपे यांनी सुंदर गीत गायन केले.