देऊळगाव घाट. (प्रतिनिधी)भारत सरकारच्या उन्नत भारत अभियानाच्या माध्यमातून, ग्राम विकासासंदर्भात राबविल्या जाणाऱ्या योजनेसाठी, बा.बा. दानवे शैक्षणिक संकुल देऊळगाव घाट ता.आष्टी जि.बीड येथील स्वर्गीय रामचंद्र दादा धस वरिष्ठ महाविद्यालयाची निवड झालेली असून, महाविद्यालयाच्या वतीने परिसरातील देऊळगाव घाट, दौलावडगाव, शेडाळा, सावरगाव, बांदखेल, या गावांना पहिल्या टप्प्यात ग्राम विकासाशी निगडित योजना राबविण्यासाठी दत्तक घेण्यात आले आहे. पुढील वेगवेगळ्या टप्प्यात इतरही गावांना त्याचा लाभ मिळणार आहे.
भारत सरकारच्या “उन्नत भारत अभियान” योजनेअंतर्गत या सर्व योजना या गावांमध्ये राबविल्या जाणार आहेत. त्यामध्ये पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व्यवस्थापन, मूलभूत सुविधा, शाश्वत ऊर्जा निर्मिती, इत्यादी योजनेचा समावेश आहे. त्यासाठी महाविद्यालयाचे कर्मचारी व स्वयंसेवक, दत्तक गावातील प्रत्येक कुटुंबाचा सर्वे करून, अहवाल सादर करणार आहेत.
सोबतच डोंगरी/ दुर्गम भागातील माता-भगिनींच्या सोयीसाठी, बा.बा. दानवे शैक्षणिक संकुलातील छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजकार्य महाविद्यालयाच्या वतीने, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचे फॉर्म विना शुक्ल भरून दिले जाणार आहेत. महाविद्यालयाचे स्वयंसेवक घरोघरी येऊन, विना शुक्ल फॉर्म भरून देणार आहेत. तरी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन बा.बा. दानवे शैक्षणिक संकुलनाचे सर्वेसर्वा, विजयकुमार दानवे यांनी केले आहे.