spot_img
spot_img

पाथर्डी तालुक्यात पावसाचे जोरदार कमबॅक… काही ठिकाणी ओढे.. नाले.. तलाव ओव्हरफ्लो..

पाथर्डी (प्रतिनिधी) :- . तालुक्यात पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने खरीप पिकांना जीवदान मिळाले असून यंदाचा खरीप हंगाम 100% साधला जाण्याची अपेक्षा या पावसाने निर्माण झाली आहे. कृषी खात्याच्या माहितीनुसार तालुक्यात खरिपाच्या शंभर टक्के पेरण्या झाल्या अत्यंत वेळेवर पाऊस आल्याने पिके पूर्णपणे वाचली आहेत. काल दुपारनंतर सुरू झालेला पाऊस जोरदार सरींच्या रूपात पहाटेपर्यंत सुरू होता‌. पाथर्डी येथे 75 मिलिमीटर, माणिकदौंडी 117, टाकळीमानुर ६६, कोरडगाव १८, करंजी 38, तर मिरी केंद्रावर 22 मिलिमीटर पाऊस नोंदला गेल्याचे सांगण्यात आले. या पावसाने पाणीटंचाई दूर होण्याची शक्यता असून तूर, मूग, सोयाबीन, उडीद, बाजरी, भुईमूग, कापूस यासह ऊस पिकाला पूर्णपणे जीवदान मिळाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागली होते. आणखी आठवडाभर पाऊस लांबला असता तर हलक्या जमिनीतील खरीपाची पिके वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले असते. आता मात्र हे संकट टळले आहे. पिकासाठीची चांगली ओल झाल्याने किमान पंधरा दिवस पाऊस लांबला तरी पिकांची गरज भागली आहे. नेहमीच्या अनुभवाप्रमाणे आषाढी वारी झाल्यानंतर म्हणजे पुष्य नक्षत्राच्या आसपास या भागात पावसाला सुरुवात होते. आता आषाढी वारी अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे पिकांची शाश्वती गृहीत धरून शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात यंदा प्रथमच तूर ,सोयाबीन ,उडीद अशा पिकांमध्ये वाढ होऊन बाजरीचे क्षेत्र घटले आहे. अन्नधान्य ऐवजी कडधान्य व ऊस, कापूस यासारखी रोखीची पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. कृषी विभागाच्या पाहणीनुसार तालुक्यामध्ये खरीपाच्या पिकाची परिस्थिती अत्यंत चांगली आहे. कडधान्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये तालुक्याने स्वतःची ओळख निर्माण केली असून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली कडधान्य व त्यासाठी तालुक्याचे अनुकूल असलेले हवामान कडधान्याची प्रतवारी उंचावण्याकडे पूरक ठरत आहे. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्याने बाजारपेठेमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण आहे. तालुक्यातील प्रमुख मुख्य नद्या माणिकदौंडी, करंजी या डोंगरातून उगम पावतात. योगायोगाने या भागात समाधानकारक पाऊस झाल्याने ओढे, नद्या, नाले प्रवाहित झाले असून अनेक ठिकाणी बंधारे भरले आहेत. त्यामुळे विहिरींच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे. शहराच्या परिसरातील वाडी वस्तीवरील प्रमुख बंधारे भरले असून माणिकदौंडी परिसरातील बंधारे मोठ्या प्रमाणावर भरभरून वाहत आहेत.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!