spot_img
spot_img

मौन साधनेत प्रचंड शक्ती मौन साधनेने परमात्माची प्राप्ती – हभप मुकुंद महाराज जाटदेवळेकर

पाथर्डी (प्रतिनिधी):- आपलं चांगलं व्हावे असे वाटत असेल तर इतरांच्या भल्यासाठी प्रार्थना करा. कोणाविषयी अपशब्द, निंदा, टीका करू नका‌ मनाची चंचलता कमी करून सकारात्मकता वाढवायची असेल तर दररोज किमान तीन तास मौन धारण करा. मौन साधनेतील प्रचंड शक्तीचा वापर परमात्म्याच्या प्राप्तीसाठी करावा, असे आवाहन वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ उपासक तथा महान तपस्वी मुकुंद महाराज जाटदेवळेकर यांनी केले.

गेले दीड वर्षे नाशिक जवळील दत्तधाम येथे राहून गायत्री पुरश्चरणासह विविध प्रकारे घोर तपश्चर्या मुकुंद महाराजांनी केली. अशीच सेवा वेदमूर्ती ओंकार संजय कुलकर्णी यांनीही केली त्यांचे शहरात नुकतेच आगमन झाले त्याबद्दल स्थानिक भाविकांतर्फे त्यांचा दर्शन सोहळा व भाविकांशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन कालिका देवी मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिनकर महाराज अंचवले होते. यावेळी गोविंद महाराज घायाळ, वेदपाठ शाळेचे प्रधानाचार्य सर्वेश्वर शास्त्री, वेदशास्त्र संपन्न कृष्णाशास्त्री घायाळ, आदी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी नगर, शेवगाव, आष्टी या सह तालुक्याच्या विविध भागातून भाविक उपस्थित होते. मुकुंद महाराज म्हणाले, आपण जीवनभर धावपळ करत विविध योग्य अयोग्य मार्गाचा वापर करत जे कमवतो ते सर्व येथेच सोडून जायचे आहे. जीवनातील सर्व दुःख आपणच निर्माण केलेली आहेत. त्याची फळे पुन्हा दुःख, रोग, अपमृत्यू अशा प्रकारे आपण भोगतो. केलेली कर्म सोबत येणार आहेत. आपल्या कृत्याचा लेखाजोखा इतरांनी ठेवण्याची गरजच नाही. आपण सायंकाळ नंतर काही मिनिटे निवांत बसून आपला दिवसाचा ताळेबंद मना पुढे घ्यावा. त्यात मनाला सुखावणाऱ्या घटना सकारात्मक तर अस्वस्थ करणाऱ्या घटना नकारात्मक समजल्या तर आपल्या डोळ्यापुढे कर्माचा आलेख येऊन त्यावरून आपण आपलाच गुरु होऊ शकतो. माणसाचे मन कधीही चुकीचा संकेत देत नाही. तर अहंकार, लोभ, मत्सर असे सहा विकार मनाला अयोग्य दिशेने वळवतात. मनाला बांध घालण्यासाठी मौन साधना अत्यंत महत्त्वाची आहे. माणसाने दररोज चिंतन करावे. मौनसाधना सुरू झाली की वाईट बोलने आपोआप बंद होते. नाम जपाने सत्कृत्य वाढतात. चांगले वाईट ओळखण्याची क्षमता वाढते. हळूहळू साधना वाढत जाऊन चित्तवृत्ती शांत होऊ लागल्या की हृदयातील परमात्मा प्रकट होतो. जीवनाचे ध्येय स्वर्गसुख नसून मोक्ष प्राप्ती आहे. त्याचा प्रारंभ तपसाधनेपासून होतो असे मुकुंद महाराज म्हणाले. उद्योजक रवीशेठ पाथरकर यांनी महाप्रसादाचे आयोजन केले. यावेळी रवींद्र दानापुरे, सुरेश शहाणे, शंकर रासने, शरद पाथरकर, अनिल खाटेर, गणेश पंडित, रमण लाहोटी, राम पाथरकर, विलास दानापुरे, वैभव खुटाळे आदींनी परिश्रम घेतले. माजी नगरसेवक रामनाथ बंग परीवारासह उपस्थित गावोगावच्या विविध भाविकांनी दर्शन घेऊन त्यांनी तपश्चर्या करून परत आलेल्या साधकांचा गौरव केला.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!