spot_img
spot_img

‘एआय’ला घाबरुन नैराश्यात जाऊ नका, तर आपल्यातील  ‘ओरिजनल इंटेलिजन्स’  विकसित करा. लोहार समाजातील गुणंवतांच्या सत्कारप्रसंगी देवचक्के यांचे प्रतिपादन.

अहमदनगर (प्रतिनिधी) :- एआय या नवीन तंत्रज्ञानामुळे अनेकांना नोकऱ्या गमावण्याचा धोका आहे. मात्र ‘एआय’ या  तंत्रज्ञानाला घाबरुन नैराश्यात जाऊ नये, तर आपल्यात असलेले ‘ओरिजनल इंटेलिजन्स’ (ओआय) विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला कोणत्या विषयात आवड, रुची आहे कोणत्या विषयाचा अभ्यास आपण करू शकतो. याचे आठवीपासून ध्येय निश्चित करून त्याच क्षेत्रात आपण मास्टरकी मिळवली, तर तेच आपले ‘ओरिजनल इंटेलिजन्स’ असेल आणि इतरांसाठी ते ‘एआय’ असेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा सुरभि हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुध्द देवचक्के यांनी केले.

लोहार यूथ फाउंडेशनतर्फे आयोजित  समाजातील गुणवंताचा गौरव व वधू-वर परिचय कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष कौसे हे होते. व्यासपीठावर साहित्यिक अनिल उदावंत, जिल्हा परीषदेचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे, सीएसआरडीचे संचालक सुरेश पठारे, राहुरीचे दशरथ पोपळघट, खोसपुरीचे सरपंच सोमनाथ हारेर, महापारेषणचे अभियंता दीपक आगळे, स्टेट बँकेचे व्यवस्थापक पद्माकर धकाते, रोहित जवणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक लाेहार यूथ फाउंडेशनचे किशोर सोनवणे यांनी केले.पाहुण्याचा परिचय लाेहार यूथ फाउंडेशनचे कार्याध्यक्ष हर्षल आगळे यांनी करुन दिला.

विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन करताना देवचक्के म्हणाले, तप्त लाेखंडावर घणाचे घाव घालून लोखंडाला आकार देणारा लोहार समाज आहे. नेमका घाव कुठे घालायचा हे या समाजाला चांगलेच माहिती असते. सध्याच्या मोबाइल युगात संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. ‘एआय’सोबत स्पर्धा करण्यासाठी आपलं व्यक्तिमत्त्व असं विकसित करा की तुमच्या आजुबाजुला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं आकलन तुम्हाला झालं पाहिजे, त्यासाठी वाचन, संवाद वाढवावा लागेल. तुमच्या आयुष्यात भेटणाऱ्या प्रत्येक माणसांकडनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या बोलण्यात नम्रता आहे. हे समोरच्या व्यक्तिला जाणवलं पाहिजे, तरच तो तुम्हाला माहिती देईल. या पद्धतीने आपल्या आयुष्यात बदल केले, तर कितीही प्रगत तंत्रज्ञान आलं तर तुमची संघर्ष करण्याची मानसिक तयारी होईल. 

सीएसआरडीचे पठारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले ध्येय निश्चित करुन वाटचाल करण्याचे आवाहन केले. शिक्षणाधिकारी बुगे यांनी अभ्यासक्रमाबाबत माहिती दिली. उदावंत, प्रा. कौसे यांनी विद्यार्थ्यांना योग्य अभ्यासक्रमाची निवड करुन उच्च पदस्थ होण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात दहावी, बारावी, तसेच स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या ४५ विद्यार्थी-विद्यार्थिंनींचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह, गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. 

नगरसह जळगाव, नाशिक, पुणे,  नागपूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील ३५ वधू-वरांचा परिचय सोहळा झाला. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील समाजबांधव व महिलासंह, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, धुळे येथील लोहार यूथ फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचालन शिक्षक संजय इघे, सोनवणे यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!