आष्टी :(प्रतिनिधी)आजची तरुणाई व्यसनामुळे बरबाद होत चालली आहे. मोठ्या प्रमाणात व्यसनाचा विळखा तरुणाईला पडल्याने आपल्याला काय करायचे आहे. आपले जीवन कसे सार्थक लावायचे आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो. समाजामध्ये आपण काय कामे करू शकतो.अन्याय अत्याचाराविरुद्ध लढू शकतो का याचा विचार व्यसनामुळे डोक्यात येत नाही. छत्रपती शिवाजी महराजांनी घालून दिलेला आदर्श बिगर व्यसनी होऊन सामाजिक काम करा. तरच खऱ्या अर्थाने शिवजयंती मधून आदर्श निर्माण होईल असे मत ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे यांनी व्यक्त केले.
ते कडा येथे शिवमहोत्सवात कीर्तन प्रसंगी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजच्या युवकांनी एक विचाराने राहणे गरजेचे आहे. आपापसात भांडणे करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला मोजक्या मावळ्यांसोबत टीम तयार केली होती. त्याच मावळ्यांनी आपापसात वैचारिक दृष्टिकोन ठेवून स्वराज्य निर्मितीची गुढी उभारली व रयतेला सुखी केले. आजचा युवक मात्र एक विचाराने राहत नाही, एक विचाराने राहिल्यास नक्कीच स्वतःची व समाजाची प्रगती होते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी दाखवून दिले आहे. मग आजची तरुणाई वैचारिक मतभेद का करीत आहे ? असा सवाल करत तरुणांनी या शिवजयंती पासून व्यसन न करण्याची शपथ घ्यावी असा मोलाचा सल्ला साखरे महाराजांनी दिला.
राष्ट्रमाता जिजाऊंनी छत्रपतींच्या जन्मावेळी मोठमोठी स्वप्न पाहिली होती. अन्याय, अत्याचार निपटून रयतेला सुखी करणारा पुत्र आई भवानीकडे मागितला व साक्षात आई भवानी जिजाऊंना प्रसन्न झाल्या आणि एक तेजस्वी शिवरायांच्या रूपाने त्यांना पुत्र दिला. आजची जिजाऊ आपल्या मुलांना जन्म घालते वेळी कोणते स्वप्न पाहते ? आधुनिक युगातील जिजाऊला ध्येय, स्वप्न राहिलेच नाहीत. त्यामुळे होणारी संतती देखील आपल्याला नीट होत नाही. यासाठी मासाहेबांसारखे स्वप्न पहा व पराक्रमी शूरवीर असा पुत्र जन्माला येईल. जिजाऊ शिवरायांना घडेपर्यंत जागे राहिल्या होत्या. त्यांनी छत्रपतींना घडविण्यासाठी अनेक प्रकारचे कष्ट घेतले होते. तसेच कष्ट आजच्या आधुनिक युगातील जिजाऊंनी घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याकाळी जसे राज्य चालवले त्याच पद्धतीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आहे हे विसरूनही चालता येणार नाही. आजच्या युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र हृदयापर्यंत घेऊन गेले पाहिजे व त्यावरच आपली पुढची वाटचाल केली तरच समाजात स्वतः चे नाव कमवाल. शेवटी स्त्रीभ्रूणहत्येवर प्रकाश टाकत बीड जिल्ह्यात मोठ्या प्रकारचे पाप स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणांमध्ये झालेले आहे. तो पापाचा कलंक पुसून टाकण्यासाठी युवकांनी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी परिसरातील शिवप्रेमी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.