पाथर्डी (प्रतिनिधी) :- आमदार मोनिका राजळे यांनी दहा वर्षात स्वतःच्या कार्याचा असा कोणता ठसा उमटवला की लोकांनी त्यांना लक्षात ठेवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत त्या निवडून आल्या स्वकर्तृत्वावर नाही. यापूर्वीच्या निवडणुकीत आमदार राजळे यांना पंकजा मुंडे वाली होत्या. आता पक्षाने पंकजा यांनाच साईड लाईन केल्याने मोनिका राजळे यांना फारसा स्कोप राहणार नसून येणाऱ्या निवडणुकीत त्या पुन्हा निवडून येणार नाहीत. असे भाकीत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वर्तवले. अंधारे यांनी सिंदखेडराजा येथून मातृ तीर्थ ते शिवतीर्थ अशी संपर्क यात्रा सुरू केली. यात्रेचा तालुक्यात दिवसभर मुक्काम होता. पाथर्डी येथील अजंठा चौकात मंगळवारी रात्री जाहीर सभा घेत अंधारे यांनी राज्य शासन, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजाची नक्कल करत त्यांची ही खिल्ली उडवली. तालुक्यात वंजारी समाजाची संख्या पाहता पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाकडून होणाऱ्या अन्यायाची सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी तर प्रमुख कार्यकर्ते म्हणून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत भाले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, महिला आघाडीच्या सविता भापकर, तालुकाप्रमुख भगवान दराडे, सचिन नागापुरे, नवनाथ चव्हाण आदि व्यासपीठावर उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, स्वायत्त यंत्रणांना हाताशी धरून राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. आतापर्यंत तुमचीच मन की बात ऐकत आलो. लोकांची जन की बात कधी ऐकण्याचा तुम्ही प्रयत्न केला नाही. बहोत हो चुकी मन की बात, अब करो जन की बात असे म्हणण्याची वेळ आली. रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना रामाच्या शिकवणुकीचा विसर पडला. भाजपने राज्यात बार्किंग ब्रिगेड तयार केली आहे. त्यांना फक्त ठाकरे घराण्यावर बोलण्याचे काम आहे. भाजपकडे नेत्यांची कमतरता असल्याने उचलेगिरी करून कारभार चालू आहे. निष्ठावंतांना पायदळी तुडवत असून भाजप म्हणजे भाड्याने जमलेली पार्टी बनली आहे. फडणवीसां विषयीचा बॅक फायर आमदार मोनिका राजळेपर्यंत येईल, व असे वाटत नाही की त्या पुन्हा निवडून येतील. सुडाने पेटलेले देवेंद्र फडणवीस यांनी फोडाफोडी करून काय मिळवले. निष्ठावान भाजपच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी मुंग्यांनी वारूळ बांधले. मात्र त्यामध्ये गद्दार रुपी नाग साप राहायला आले. फडणवीस यांनी यातून काय गमावले व काय मिळाले याचे उत्तर कोणी सांगू शकत नाही. भाजपमधील केशवराव उपाध्ये, माधव भंडारी, सुरजीत सीह ठाकूर अशी मंडळी कुठे गेली. विनोद तावडे यांच्या तावडीतून सुटून दिल्लीला जाऊन स्थिर झाले. गेले अडीच वर्षात कोणताच प्रश्न मार्गी लावला नसल्याने आता आरक्षणाच्या नावाखाली जाती-जातीत भांडणे लावून मराठा व ओबीसींना सरकार झुलत ठेवत आहे. अगदी वेड्यात काढायचा कार्यक्रम त्यांनी लावला आहे. ज्या गोपीनाथ मुंडेंच्या तुम्ही बॅगा सांभाळायचे, पक्षाच्या लहान मोठ्या डिबेटमध्ये भाग घ्यायचे, मुंडे यांच्या अपॉइंटमेंट सांभाळायचे त्या गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा हिचे राजकारण तुम्ही संपवले. राज्यसभेची उमेदवारी पंकजा मुंडे यांना मिळाली असती तर आदल्या दिवशी अशोक चव्हाण यांना घेऊन पंकजाचा पत्ता कट केला. राज्यातील सर्वपक्षीय जेष्ठ नेत्यांनी अनेक कार्यकर्ते घडवली. देवेंद्र फडणवीस यांनी एकाला तरी घडवले का याचे उत्तर सापडत नाही. त्यांनी फक्त राज्य बिघडवण्याचे काम तर केलेच पण पक्ष सुद्धा बिघडवला आहे. षडयंत्र करून माणसे संपवणे या पलीकडे तुमचे काम काय. ईडी सीबीआय ला पुढे करत राजकारण करत लोकशाहीला संपवण्याचा घाट घातला आहे. व्यक्ती केंद्रित राजकारण डोक्यात ठेवून वन नेशन, वन इलेक्शन ही त्यांचीच नांदी आहे. निवृत्तीवेतनाचा प्रश्न प्रलंबित ठेवला. जीव धोक्यात घालणारा वायरमन, सीमेवरील सैनिक, पोलीस अशांना निवृत्तीवेतन नाही. काही काम न करणाऱ्या आमदारांना मात्र निवृत्ती वेतन दिले जाते ही शोकांतिका आहे. पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा कार्यक्रम सुरू केला. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, शेतकरी वर्ग असे घटक जगण्याची लढाई लढत आहेत. बार्किंग ब्रिगेड ,भाटगिरी करणारे त्यांना लागतात. या सर्वांविरुद्ध अत्यंत ताकतीने व निर्भीडपणे फक्त उद्धव ठाकरे बोलतात. गेल्या दहा वर्षात सर्वाधिक गुन्हेगारी वाढली. कायदा सुव्यवस्था अस्तित्वात नाही. पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो. गंभीर गुन्हा करणारा जामीनावर तात्काळ सुटतो. सर्व काही लोकांच्या लक्षात आले आहे. राज्यातील देवेंद्र पर्व लवकरच संपलेले असेल. सज्जनांची निष्क्रियता सुद्धा अराजकतेला कारणीभूत ठरत आहे, असे अंधारे म्हणाल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान दराडे, सूत्रसंचालन सुखदेव मर्दाने तर आभार नंदकुमार डाळिंबकर यांनी मानले.