पाथर्डी (प्रतिनिधी) :-दरवर्षी प्रमाणे यंदाही माघ नवमी व नवरात्रौत्सवा निमित्त दि.१० फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत श्री चौंडेश्वरी देवीचा भव्य नवमी उत्सव देवांग कोष्टी समाजातर्फे आयोजित करण्यात आला असून, यानिमित्त नऊ दिवस विविध धार्मिक, सामाजिक, आरोग्य च सांस्कृतिक कार्यक्रमांचे व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त आज भव्य रक्तदान शिबीर पार पडले.
पाथर्डी शहरातील आखारभाग येथील चौंडेश्वरी देवी मंदिरात हा सोहळा होणार असल्याची माहिती देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष रामदास कांबळे उपाध्यक्ष कृष्णा नेपाळ व सचिव किशोर पारखे यांनी दिली.
या नवमी उत्सवानिमित्ताने आज चौंडेश्वरी मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीरास रक्तदात्यांकडुन उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरास माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, रामनाथ बंग, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शेळके, मुकुंद गर्जे, बबन सबलस आदी मान्यवरांनी भेटी देऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कोष्टी समाजाचे अध्यक्ष रामदास कांबळे, सचिव किशोर पारखे, नारायणराव भागवत, गणेश टेके, कृष्णा रेपाळ, चंद्रकांत सरोदे, सुनिल देखणे, कन्हैया सोनवणे, गणेश भागवत, रोहित काटकर, श्रीकांत उदबत्ते, शुभम पाखरे, पप्पू नरवणे, भारती असलकर, सुनिता उदबत्ते, उज्वला सरोदे आदी देवांग कोष्टी बांधव व महीला भगिनी उपस्थित होत्या. दि. १८ फेब्रुवारी रोजी चौंडेश्वरी देवीची भव्य दिव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार असून, दिवसभरात विविध धार्मिक कार्यक्रमांसह कावडी मिरवणूक, गंगाजल अभिषेक, पालखी
मिरवणूक चौंडेश्वरी मातेचे पूजन आणि महाआरती होणार आहे. तर दि.१९ फेब्रुवारी रोजी महाप्रसाद व महिला भाविकांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा विशेष मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध निवेदक छोटे भाऊजी सिद्धार्थ पन्हाळे हे करणार आहेत.