पाथर्डी (प्रतिनिधी):-पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती आपल्या भारतीय संस्कृतीत होती. स्त्रीला घराबाहेर पडायला अनेक बंधनं होती. पण या हळदी कुंकवाच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या. हळूहळू समाजात प्रगती होत गेली. पुढे जाऊन स्त्रीचे ही स्वतंत्र अस्तित्व निर्माण होत गेले. स्त्रीया एकमेकींना हळदी कुंकू लावतात हा केवळ नवऱ्याला उत्तम आयुष्य लाभून आपल्या मैत्रीण चा संसार सुखाचा होवो अशी शुभकामना त्या मागे असते. असे मनोगत सौ हर्षदा अमोल गर्जे यांनी व्यक्त केले.
वंजारी महिला मंडळाच्या वतीने पाथर्डी शहरातील अतिथी मंगल कार्यालयात हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गर्जे बोलत होत्या . या कार्यक्रमात सुमारे सहाशे महिला भगिनींनी हळदी कुंकवाचा आनंद घेत मकर संक्रांतीचा सण साजरा केला. माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, योगिता राजळे, माजी नगराध्यक्षा रंजना गर्जे, सविता भापकर, मंगल कोकाटे, भालगावच्या माजी सरपंच डॉ.मनोरमा खेडकर, सरकारी वकील प्रज्ञा शिरसाट, कुसुम वारे, डॉ.शारदा गर्जे,डॉ.मनिषा देशमुख, डॉ.आरती जायभाय, डॉ.जयश्री आव्हाड स्वाती दराडे आदी उपस्थित होत्या.
शहरातील माहेश्वरी महिला,विश्वकर्मा महिला,कासार समाज महिला, रामराज्य महीला,सुवर्णयुग महिला,संघर्ष महिला व सखी महिला मंडळ आशा अनेक संघटनांच्या सुमारे सहाशेहून अधिक महिलांनी या मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकवाचा आनंद लुटला.
पुढे बोलताना गर्जे म्हणाल्या, आजच्या नव्या प्रचंड मोठ्या ताणतणावाच्या युगात कोणालाच वेळ देता येत नाही मात्र या कार्यक्रमातून स्त्रिया भेटून आपल्या सुखाच्या आणि दुःखाच्या गप्पा मारत आनंद साजरा करतात. यातून मैत्री, सण, उत्सव आणि आपली संस्कृती असा मेळ घडत आहे.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनिषा घुले, हर्षदा गर्जे संगीता शिरसाठ, शालिनी आव्हाड, जयश्री ढाकणे, ज्योती गर्जे, वैशाली राख, वंदना ढाकणे, अनिता डमाळे, मनीषा आंधळे , जयश्री कीर्तने आदींनी परिश्रम घेतले.