spot_img
spot_img

मोबाईलच्या शौकासाठी अल्पवयीन मुलांनी लुटली कुरीयर व्हॅन मधील रोख रक्कम पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी…अवघ्या दोन दिवसात लावला गुन्हयाचा छडा…

पाथर्डी (प्रतिनिधी) : शहरातील नामवंत विद्यालयात दहावीच्या वर्गात शिकणारी पोरं ….आई वडील ऊस तोडणी कामगार…. शिक्षणासाठी पाथर्डीला नातेवाईकांकडे राहून शिक्षण…. एकाला नवीन मोबाईल घ्यायचा, तर दुसऱ्याला बंद पडलेल्या मोबाईल दुरुस्त करायचा…. हाती पैसा नसल्याने शकल लढवली.. कुरियर व्यावसायिकाच्या गाडीच्या डिकीतून पैसे चोरले… तांत्रिक तपासात अलगद पोलिसांच्या हाती अल्पवयीन आरोपी लागले. गेल्या बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नगरच्या आधुनिक कुरिअर सर्व्हिसची गाडी नेहमीप्रमाणे पाथर्डीत आली. क्रांती चौकातील गांधी मेडिकल समोर गाडी लावून गाडीचे चालक बाबासाहेब पवार परिसरातील दुकानात पार्सल देण्यासाठी गेले. तेवढ्या वेळात शाळेच्या सेक (दप्तर) पाठीवर लावलेल्या दोन तरुणांची मोटरसायकलवर एन्ट्री होते. अलगदपणे पैशाचे बंडल घेऊन आरोपी निघून गेले. आठवडे बाजारच्या दिवशी भर बाजारपेठेत असा प्रकार घडल्याने सर्वत्र घबराट उडाली. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लिमकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल आव्हाड, लक्ष्मण पोटे, रामभाऊ सोनवणे या कर्मचाऱ्यांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परिसरातील सर्व दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अजंठा चौकातील व त्यापुढील एका व्यावसायिकाच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक तरुण मास्क लावलेला बसलेला, एक तरुण उघड्या तोंडाने गाडी चालवत असल्याचे स्पष्ट दिसले. गाडी नंबर वरून तपास केला असता ती गाडी पुण्याच्या एका व्यक्तीच्या नावावर होती. त्यांनी गाडी विकली पण घेणाऱ्यांनी नावावर करून घेतली नव्हती. पोलिसांनी राज्यभर सीसीटीव्ही फुटेज व घटनाक्रम पाठवला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात शोध मोहीम राबवली. आरोपी पाथर्डीचे व गावातच असल्याची खबर त्यांना मिळाली. गुरुवारी सकाळी पथकाला एका हॉटेलमध्ये दोन्ही आरोपी नाश्ता करीत असून हॉटेल समोरच गाडी लावल्याची खबर मिळाली. पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत सविस्तर विचारपूस केली असता मोबाईल साठी चोरी केल्याचे डोके सुन्न करणारे कारण पुढे आले व गुन्हा पाळत ठेवून केल्याचे समोर आले. आरोपीकडील मोटरसायकल, रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली. व्यापाऱ्यांनी कुरियर वाले कडे जसे बंडल दिले, तसेच बंडल नोटांचे होते. वातावरण निवळे पर्यंत पैसे घरी ठेवून काही दिवसानंतर त्याची विल्हेवाट लावायचे दोघांचे ठरले होते. पोलिसांना आरोपीच्या नातेवाईकांनी माहिती मिळाल्या नंतर पैसे काढून दिले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे आई-वडील ऊस तोडणी साठी गेले असून एक आरोपी मोराळ्याचा, तर दुसरा खरडगावचा असून एक जण बहिणीकडे तर दुसरा मामाकडे राहून शिक्षण घेत होते. वर्गात त्यांची मैत्री झाली. आपल्याला चांगला मोबाईल नाही व मित्राकडील मोबाईल मुळे झालेली ईर्षा त्यातून मनात निर्माण झालेली सल यातून आरोपींनी चोरीचे असे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मौजमजेसाठी किशोरवयीन मुले कोणत्या थराला चालले आहेत याचे प्रतिनिधी उदाहरण शहरात घडले आहे. पोलिसांनी पालकांना नोटीस बजावून आरोपींना त्यांच्या हवाली केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक बाबींचा आधार घेत तत्परतेने गुन्ह्याची उकल केली या पोलिसांच्या तत्परतेबद्दल व्यापाऱ्यासह नागरिकांनी कौतुक केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!