पाथर्डी (प्रतिनिधी):- मकर संक्रांतीचा सण शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एकमेकांना तिळगूळ देत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावुन व सौभाग्याचे लेणे असलेल्या वाणांची देवाण-घेवाण करून शुभेच्छा दिल्या. शहरातील विविध भागातील मंदिरात महिलांनी वान ओवसण्यासाठी व दर्शनासाठी गर्दी केली होती.
तालुक्यातील मोहटादेवी मंदिरात सकाळपासूनच संक्रांती निमित्ताने नगर, बीड, छ.संभाजीनगर आदी जिल्ह्यातून आलेल्या महिला भाविकांची मोठी गर्दी दिसून येत होती. मकरसंक्राती निमित्ताने दरवर्षी मोहटादेवी मंदिरामध्ये ओवसा वाहण्यासाठी राज्यातील विविध ग्रामीण व शहरी भागातून मोठ्या संख्येने महिला मोहटादेवी गडावर येत असतात. देवस्थानच्या वतीने दर्शन सुलभ व्हावे, संक्रांतीसाठी महिलांना पुजा करता यावी देवीला हळदकुंकू वाहता यावं म्हणून देवीचा चांदीचा मुखवटा मंदिरासमोरील सभागृहात ठेवण्यात आला होता. यावेळी महिलांनी देवीला हळदी-कुंकू लावून सौभाग्याचं लेणं असलेला वाणववसा देवीला अर्पण करून मोठ्या भक्ती भावाने देवीची खणा नारळाने ओटी भरली.
नवीन वर्षातील पहिला सण असलेला मकर संक्रांतीमुळे मागील पाच सहा दिवसांपासून बाजारातही तिळगुळाबरोबर वाणाचे साहित्याची विक्री जोरदार झाली. संक्रांतीसाठी लागणाऱ्या वाण, सुगडे, बोर, ओवसाचे वस्तूचे स्टॉल्स बाजारतळ, अजंठाचौक, मेनरोड, नवीपेठ आदी ठिकाणी लावण्यात आले होते. हळदी-कुंकु, सोने चांदी, साड्या, सौंदर्य प्रसाधने, बांगड्या, विविध वाण खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची गर्दी होती