पाथर्डी (प्रतिनिधी):- भारत सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांचा लाभ वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम मागील काही दिवसांपासून केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेअंतर्गत काल पाथर्डी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक अमोल मदने व पाथर्डी नगरपरिषदेच्या वतीने या चित्ररथाचे स्वागत करण्यात आले व यावेळी विविध विभागातील योजनांची माहिती देणारे स्टॉल व शिबिर नगरपरिषद कार्यालय समोर लावण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन दरंदले होते. यावेळी महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक परदेशी, सहा.प्रकल्प अधिकारी अनिल कोळगे, नगर अभियंता विशाल मढवी, पाणीपुरवठा अभियंता सचिन राजभोज, समूह संघटक समीना शेख, डॉ.वृषाली कोळी, डॉ.प्रवीण पाखरे, डॉ. सुवर्णा सावंत, माजी नगरसेवक रमेश गोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दरंदले म्हणाले की, केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार काम करते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे तसेच या माध्यमातून लाभार्थी कुटुंबाच्या जीवनात बदल घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत या यात्रेच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवा विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिशन मोडवर काम करा, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजना, महिला बचत गट कर्ज वितरण, पाच लाखांपर्यंत मोफत आरोग्य उपचाराची सोय, उज्वला गॅस, मोफत अन्नधान्य, घरकुल योजना यांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन यावेळी दरंदले यांनी केले.
या यात्रेत दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना (आयुष्यमान भारत), प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री स्वनिधी से. समृध्दी योजना, आधार अपडेट / दुरुस्ती, आरोग्य तपासणी शिबिर, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना आदींचा समावेश आहे.
केंद्र शासनाच्या योजनांची माहिती देणारा हा चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात फिरविला जात असून त्या माध्यमातून या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे. यात्रेच्या निमित्ताने लाभार्थ्यांशी संवाद देखील साधण्यात येत आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ नारळकर, अशोक डोमकावळे, दत्ता ढवळे, रवींद्र बर्डे, पंकज पगारे, शुभम काळे, नवाज शेख, संजय खोर्दे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कोळगे प्रास्ताविक अंबादास साठे यांनी केले तर आभार किशोर पारखे यांनी मानले.