पाथर्डी (प्रतिनिधी):- महामार्ग क्रमांक ३६१ एफ व ७५२ या रस्त्यांच्या बांधकामात भालगांव व पंचक्रोशीतील शेतकर्यांच्या गेलेल्या जमीनींच्या मंजुर मोबदल्यासाठी आज भालगांव येथील ग्रामस्थांनी, विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी उपोषण सोडले.
याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे की, उपरोक्त दोन्ही रस्त्यांच्या बांधकामात गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळावा म्हणून आम्ही यापूर्वी आपल्या कार्यालयास निवेदन सादर केले होते. काही महिन्यांपूर्वी आपण व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आम्हाला एक महिन्यात दोन्ही रस्त्यांच्या बांधकामात गेलेल्या जमिनींचा मोबदला दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर, आपल्या कार्यालयाकडून तीन महिन्यांपूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली आहे. परंतु, आजतागायत एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे, आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आज ०२ जानेवारीपासून आपल्या कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. निवेदनावर उद्धव खेडकर, अंकुश कासुळे, बाबासाहेब खेडकर, संजय बेद्रे, सावता बनसोडे, बाजीराव सुपेकर, भागवत कुटे, उत्तम बनसोडे, बापुराव सुपेकर आदि २६ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
➡️सरकारकडून शेतकऱ्यांना, बळीराजा, लाखोंचा पोशिंदा, अन्नदाता आदी उपाध्या दिल्या जातात. परंतु, त्यांच्या जमिनींचा हक्काचा मोबदला देण्यात टाळाटाळ केली जाते. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही शासकीय पातळीवर प्रयत्न करत आहोत. थातूरमातूर उत्तरे देऊन आमची बोळवण केली जाते. उपविभागीय कार्यालयाकडे पाठपुरावा करायला हवा म्हणून आम्ही उपोषणास बसलो आहोत. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला नाही तर आमच्या गावासह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना सोबत घेऊन अन्य मार्गांनी आंदोलने केली जातील.
दिलीपराव खेडकर : विभागीय प्रदूषण आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
➡️रस्त्याच्या बांधकामात जमिनी गेलेल्या ज्या ४५ शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे, त्यांना येत्या आठ दिवसांत मोबदला मिळेल. उर्वरीत ५४ शेतकऱ्यांची कागदपत्रे आल्यावर त्यांनाही लवकरात लवकर मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
प्रसाद मते : उपविभागीय अधिकारी, भाग पाथर्डी