spot_img
spot_img

पाथर्डीत राज्यस्तरीय खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचे शानदार उद्घाटन बुद्धिबळ खेळामुळे चांगले मानसिक आरोग्य प्राप्त होते – प्रसाद मते

पाथर्डी (प्रतिनिधी):- आनंद चेस क्लब व महाराष्ट्र सेवा मंडळ यांच्या विद्यमाने आयोजित व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय सुगंधचंदजी कुचेरिया यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय विविध गटातील खुल्या बुध्दिबळ स्पर्धेचा उद्घाटन समारंभ शहरातील माहेश्वरी राम मंदिराच्या सभागृहात प्रांताधिकारी प्रसाद मते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.

यावेळी व्यासपीठावर अ.नगर जिल्हा चेस क्लबचे यशवंत बापट, प्राचार्य अशोक दौंड, उद्योजक वैभव शेवाळे, बुद्धिबळ खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच सागर गांधी, डॉ. शिरीष जोशी, डॉ विनय कुचेरिया आदी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रांताधिकारी प्रसाद मते म्हणाले की, कोणत्याही शहराची किंवा तालुक्याची संस्कृती व सांस्कृतिक ओळख ही त्या गावात होणार्या स्पर्धा व कार्यक्रमावरून होते. खेळाडू मधील ऊर्जा व संधीला अशा स्पर्धांमुळे व्यासपीठ मिळते. पाथर्डी सारख्या ग्रामीण भागात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकनांचे खेळाडू तयार झाले हे या स्पर्धेचे यश आहे. यांच्यामुळे तालुक्यातील खेळाडूंना विविध स्तरांवर संधी प्राप्त झाल्या. खेळामुळे विद्याथ्यांमध्ये
आत्मविश्वास निर्माण होतो. या खेळासाठी शारीरिक फिटनेस व मानसिक फिटनेस, मेंदू व मनाची एकाग्रता महत्त्वाची आहे. एखादा उपक्रम सलग 29 वर्षे चालू ठेवणे सोपे नाही यासाठी मोठी मेहनत व खेळाप्रती समर्पण लागते. बुद्धिबळामुळे मानसिक आरोग्य वाढते. विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक वाढतो व बुद्धीचा विकास होतो. या खेळामुळे अपयश पचवण्याची ताकद निर्माण होते व यशाची गोडी लागते.
यावेळी बोलताना प्रा. अशोक दौंड म्हणाले म्हणाले, स्पर्धेमुळे खेळाडूंमध्ये नेतृत्वगुण व व्यक्तिमत्व विकास, खेळाडूमध्ये आत्मविश्वास तसेच जय-पराजय पचवण्याची क्षमता विकसित होते. सर्व खेळाडूंनी स्पर्धेत खिलाडूवृत्तीने खेळाचे असे आवाहन केले. वैभव शेवाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी सोलापूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नगर सह राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या सुमारे 215 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. या स्पर्धेमध्ये ५ वर्षापासून ते ८० वर्षाच्या खेळाडूंचा तसेच राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंचाही सहभाग आहे. या स्पर्धेसाठी विविध गटात मिळुन लाखो रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
स्पर्धेचे आयोजन व नियोजन, राहण्याची व भोजनाची उत्कृष्ट सोय केल्याबद्दल खेळाडूंनी समाधान व्यक्त केले. या स्पर्धेमुळे पाथर्डी तालुक्याला महाराष्ट्रात वैभव प्राम झाले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.शिरिष जोशी, सूत्रसंचालन महाजन सर तर आभार संजय ससाणे यांनी मानले. स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन डॉ .विनय कुचेरिया, राम पाथरकर, चंदन कुचेरिया, भाऊसाहेब गोरे, सागर दराडे, गणेश भागवत यांनी केले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!