आष्टी (प्रतिनिधी) जीवनात संकटे, प्रश्न,येणा-या अनेक अडचणी या अविभाज्य घटक आहेत परंतु या अडचणीवर मात करून जिद्द,मेहनत, चिकाटी,
आत्मविश्वास आणि सातत्य या बाबीवर भर दिल्यास स्पर्धात्मक परीक्षेतील यश हमखास मिळतेच मिळते,मला हे जमेल का? अशी मानसीकता ठेवु नका. कुठल्याही छोट्या मोठ्या परीक्षेला कमी समजू नका असे प्रतिपादन आष्टीचे नायब तहसीलदार अश्विनी पडोळे यांनी आज येथे दिला.
आष्टी तालुक्यातील कडा येथे आनंदराव धोंडे महाविद्यालयातील युवा विद्यार्थ्यांसाठी संस्था आणि महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने स्पर्धात्मक परीक्षेतील यश, समस्या आणि उपाय या विषयाच्या अनुषंगाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नायब तहसीलदार अश्विनी पडोळे बोलत होत्या. व्यासपीठावर आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आधीसभा सदस्य प्रोफेसर डॉ.हरिदास विधाते,नायब तहसिलदार भगीरथ धारक,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,श्रीराम कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय धोंडे,डाॕ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर महाराष्ट्र आजीवन शिक्षण विस्तार विभागाचे समन्वयक प्रा.डाॕ. शाम सांगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रस्ताविक प्रा.डाॕ.शाम सांगळे यांनी केले.यावेळी प्राचार्य डाॕ.हरिदास विधाते यांचे भाषण झाले.
यावेळी नायब तहसिलदार श्रीमती पडोळे म्हणाल्या की,ग्रामीण भागातील शिक्षण क्षेत्रात अत्यंत मौलिक योगदान देणारे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची शिकवण आपल्या कार्यातून निर्माण करणारे आष्टी, पाटोदा,शिरूरचे माजी आ.भीमराव धोंडे यांचे वडील कै. आनंदराव धोंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्ज्वल करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार अश्विनी पडोळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाल्या, भविष्यात तुम्हाला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागेल या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मनामध्ये सकारात्मक भाव आणि आत्मविश्वास असू द्या.स्पर्धा परीक्षेची प्रचंड मेहनत करा. स्पर्धात्मक परीक्षा ही सोपी बाब नसली तरी ती अशक्य नाही असा विश्वास देत त्या म्हणाल्या, मी सुरुवातीला अभ्यास करताना अनेक समस्यांना सामोरे गेले परंतु मैत्रिणी तसेच माझे पती यांनी मला विश्वास आणि दिशा दिली त्यातून मार्ग सुकर बनला.जास्त अडचणीत माणूस जास्त पाय हलवतो आणि भक्कम बनतो असे सांगून त्यांनी कुठल्याही परीक्षेला कमी समजू नका.मन लावून अभ्यास करत त्यात जीव ओतून यशासाठी प्रयत्नशील राहा असा सल्ला दिला. यावेळी त्यांनी स्वतःचे अनेक अनुभव विद्यार्थ्यांना शेअर करत त्यांच्यामध्ये नवचैतन्य आणि आत्मविश्वास देण्याचा यशस्वी प्रयत्न केला.अध्यक्ष स्थानावरून बोलताना आनंदराव धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रोफेसर डॉ. हरिदास विधाते यांनीही विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.ग्रामीण विद्यार्थ्यात प्रचंड अभ्यासाची कुवत आणि क्षमता असते. त्यांनी या भागातील यशस्वी झालेल्या अधिकाऱ्यांची प्रेरणा घेतल्यास आणि महाविद्यालयातील ग्रंथांचा अभ्यासासाठी आधार घेतल्यास विविध परीक्षेसाठी तुम्ही नक्की यशस्वी व्हाल अशा शुभेच्छा दिल्या.बाबाजी धोंडे महाविद्यालयातील भव्य ग्रंथालयाचा आणि अनुभवी उच्चशिक्षित प्राध्यापक यांच्या ज्ञानाचा फायदा आपल्यासाठी सदैव असेल असे सांगितले.स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन कार्यक्रमासाठी आनंदराव धोंडे महाविद्यालयातील उपप्राचार्य,वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक इतर कर्मचारी आणि महाविद्यालयातील युवा वर्ग आणि युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.संचलन प्रोफेसर ढवळे यांनी तर आभार उपप्राचार्य संजय धोंडे यांनी मानले.