पाथर्डी प्रतिनिधी (अनिल खाटेर):- राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मल्ल्यांच्या कुस्त्यांचा थरार … लाखोंची बक्षिसे… कुस्ती स्पर्धेचे भव्य दिव्य व नेटके नियोजन.. खुमासदार व माहितीपूर्ण समालोचन.. हलगीचा कडाडणारा आवाज.. भव्य जंगी मैदान.. दंड मांडया ठोकत दिलेली सलामी.. हजारो प्रेक्षकांची गर्दी.. टाळ्यांच्या कडकडाट.. आणि बजरंगबलीची गगनभेदी गर्जना अशा अभुतपूर्व वातावरणात पार पडलेल्या वडार समाज संघटनेने आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेमुळे पाथर्डी तालुक्यातील कुस्तीप्रेमींना अविस्मरणीय व थरारक चितपट कुस्त्यांची मेजवानी मिळाली.
पाथर्डीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात माजी नगरसेवक तुकाराम पवार व सरपंच रविंद्र उर्फ भोरु म्हस्के, मच्छिंद्र पवार, पैलवान सुभाष पवार यांच्या पुढाकाराने जंगी कुस्त्यांच्या हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रातील आणि भारतातील नामवंत पैलवानांचा या स्पर्धेमध्ये सहभाग, भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखे असे दिमाखदार, डोळे दिपवून टाकणारे नियोजन या स्पर्धेसाठी करण्यात आले होते. अतिशय रंगतगार ठरलेल्या या स्पर्धेत यंदाची शेवटची जाहीर पाच लाख एकावन्न हजार रुपये इनाम असलेली कुस्ती ही जागतिक सुवर्ण पदक विजेता इराणचा रिझा पैलवान व डबल उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात झाली. ती लढत उत्कंठावर्धक ठरली. कुस्तीच्या फडात झालेल्या या स्पर्धेला अनपेक्षित गदीं लोटली होती. सुमारे दहा हजार पेक्षा जास्त कुस्ती प्रेमींनी स्पर्धा पाहण्यासाठी गर्दी केली होती. हभप रामगिरी महाराज यांच्या हस्ते आखाडा पुजन करण्यात आले. पोलिस निरिक्षक विलास पुजारी, माजी नगराध्यक्ष सुभाष घोडके,अभय आव्हाड, बाळासाहेब ताठे, बंडु पाटील बोरुडे, मुकुंद गर्जे, प्रतिक खेडकर, मा.नगरसेवक तुकाराम पवार, समाजाचे राज्य अध्यक्ष भरत विटकर, भोरु म्हस्के, पै.सुभाष पवार, मच्छिंद्र पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, संदीप पवार, लहु पवार, अर्जुन घायतडक, रणजीत भैय्या बेळगे, सुखदेव धोत्रे, हरी पवार, दत्तु पवार, अन्नु धोत्रे, गोरख पवार, अंकुश पवार, पिराजी पवार,संजय माने, महेश पवार, आण्णा पवार, पांडुरंग माने, अनिल धोत्रे उपस्थित होते. या स्पर्धेत पै.धनराज पवार, संघर्ष म्हस्के,आयुष पवार, बबलु पवार यांच्या ही लढती रोमहर्षक झाल्या. राज्याभरातुन आलेल्या सुमारे १५० पेक्षा जास्त मल्ल्यांच्या कुस्त्या या आखाड्यात झाल्या त्यासाठी प्रथम साडे पाच लाख, द्वितीय चार लाख, तृतीय तीन लाख, चतुर्थ दोन लाख अकरा हजार तर पाचव्या लढती साठी एक लाख एकावन्न हजार सहाव्या लढतीसाठी एक लाख अकरा हजार व इतर लाखों रुपयांची इनाम देण्यात आले. दोन महिला कुस्तीपटूच्या ही लढती झाल्या. पंढरपूर येथील समालोचक धनाजी मदने व अकलुज येथील युवराज केचे यांच्या पहाडी, भेदक व भारदस्त आवाजातील अतिशय उत्कृष्ट समालोचनाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवले. या आखाड्याच्या आयोजन व नियोजनासाठी अनेक कुस्ती प्रेमींनी पवार बंधु व म्हस्के यांचे अभिनंदन करुन धन्यवाद दिले.