आष्टी (प्रतिनिधी) तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांपासून सर्वदुर अतिवृष्टी झाल्याने तलाव ओव्हर फ्लो झाले नदी,नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात सडत आहे, उभ्या पिकाला कोंब फुटले आहेत. कापूस, तुर, कांद्यात पाणी साचले. खरीप हंगामातील पिके पाण्यात कुजल्याने हाती काहीच लागणार नाही. शेतात गुडघाभर पाणी साचल्याने रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नुकसानीची पाहणी करण्यासाठी पांढरे शुभ्र कडक कपडे घालून आलेले आमदार खासदार, मंत्री नुकसानग्रस्तांच्या पाठीवर हात फिरून मदत मिळून देऊ अस आश्वासन देतात.
भोळी भाबडी जनता त्यावर विश्वास ठेवते. सरकार पंचनामे करून मदत देऊ अस सांगते तर विरोधी पक्ष
तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करत आहे. लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत कधी मिळणार हे आताच सांगता येणार नाही. एकीकडे हाता तोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने गेला तर
तर दुसरीकडे पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे बचत खाते स्टेट बँक ऑफ इंडियाने गोठवल्याने बँकेमध्ये ठेवलेली तुटपुंजी अडकून पडल्याने शेतकऱ्यावर आसमानीसह सुलतानी संकट उभे राहिले आहे.
आष्टी तालुक्यातील शेतकरी पावसावर आधारित शेती मोठ्या प्रमाणावर करतात खरिप हंगामात उडिद, सोयाबीन , मुग, मका,कांदा ,तुर यासारखी पिके घेतात. मागील पंधरा दिवसांपासून अतिवृष्टीने अक्षरश: धुमाकूळ घातल्याने नदी- नाले, तलाव ओव्हर फ्लो होऊन दुथडी भरून वाहत आहेत.
महागडी खते बियाणं खरेदी करून शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली ऐन काढणीत उडिदाचे उभे पिक पाण्यात भिजल्याने कवडीमोल भावात विक्री करावी लागली.सोयाबीन उभे पिक पाण्यात भिजुन कुजले आहे . तर अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. कापूस,कांदा,तुर ही उभी पिके पाण्यात आहेत. महागाई मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बी- बियाणे,खते ,मजुरी यामुळे शेती तोट्यात जाऊ लागली आहे तर दरवर्षीच आसमानी संकटात सापडत असल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अनेक शेतकरी गळफास घेऊन जिवन यात्रा संपवत असल्याच्या घटना घडत आहेत. आसमानी पाठोपाठ बॅंकेतील खाते बंद झाल्याने या सुलतानी संकटाने शेतकरी हवालदिन झाला असून बळीराजाच्या आत्महत्या होण्याची वाट सरकार पाहात आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
➡️ ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांचे दिवाळ निघणार-
परतीच्या पावसाने काढणीस आलेल्या सोयाबीनीत पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले . कापूस, तूर,कांदा मका पाण्यात आहेत.शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.ऐन दिवाळीच्या सणात शेतकऱ्यांचे दिवाळ निघणार असल्याने शेतकरी हताश झाला आहे.
➡️ काढणीला आलेले सोयाबीन पाण्यात गेले-
तालुक्यात यावर्षी सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सध्या काढणीला आले असून उभे पिक पाण्यात कुजून गेले आहे. अतिवृष्टीने अतोनात नुकसान झाले असून सरकारने तात्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी. सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची पीक कर्जमाफी करु असे सरकारने जाहीर केले होते. आता त्यांना त्याचा विसर पडला आहे एकीकडे कर्जमाफी देण्यास टाळाटाळ करत आहे. तर आर्थिक अडचणीमुळे पीक कर्ज थकीत झालेल्या शेतकऱ्याचे बँक खाते बंद करून मरण यातना भोगणाऱ्या शेतकऱ्यांच्या गळ्यातील फासा अधिक घट्ट करण्याचं काम सरकार करू पाहत आहे.
(राम सांगळे, शेतकरी )
गोठवण्यात आलेले खाते पूर्ववत सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल-
अतिवृष्टीने सर्वच पिके पाण्यात गेल्याने शेतकरी उध्वस्त झाला आहे. आमदार, खासदार, मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर वेदना जाणून घेण्यासाठी पाहणी दौरे काढताना प्रसारमाध्यमावर दिसून येत आहे. तर दुसरीकडे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे बँक खाते घोटून बचत खात्यामध्ये असलेली तुटपुंजी रक्कम खात्यात अडकून पडली आहे. एकीकडे सरकार सांत्वन करताना दिसते तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा गळा गोठवण्याचा डाव सरकाराकडून सुरू आहे. गोठवलेले बँक खाते तात्काळ पुर्ववत सुरू करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
(संपत सायकड, सामाजिक कार्यकर्ते)
धामणगाव, कडा,डोईठाण,दौलावडगाव, धानोरा, लोणी, टाकळसिंग, पिंपळा, आष्टी, आष्टा ह.ना, दादेगाव इत्यादी सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली आहे.