spot_img
spot_img

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर; रामनाथ गुंजाळ यांचा शिक्षक बांधवांच्या हस्ते सत्कार

आष्टी (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील लमाणवाडी (जोमदरा) येथील सहशिक्षक रामनाथ ज्ञानदेव गुंजाळ यांना यंदाचा स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला असून, या यशाबद्दल त्यांचा शिक्षक बांधवांनी जाहीर सत्कार करून गौरव केला.
गुंजाळ सर गेल्या सात वर्षांपासून लमाणवाडी शाळेत कार्यरत असून, या कालावधीत त्यांनी शाळेचा सर्वांगीण कायापालट घडवून आणला आहे. केंद्रीय मुख्याध्यापक दादासाहेब चितळे व लमाणवाडी शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब वामन यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी शाळेत हस्ताक्षर स्पर्धा, आदर्श परिपाठ, आनंददायी शनिवार, विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा, निसर्ग सहल असे अनेक उपक्रम राबवले. शाळेत ‘स्वच्छ मिशन’, ‘एक पेड़ माँ के नाम’ अशा मोहिमांमध्येही सक्रिय सहभाग नोंदवून शालेय परिसर सुशोभित करण्यात आला. आज या शाळेतील मुले इंग्रजी वाचनासोबत मराठी वाचनातही प्रावीण्य मिळवू लागली आहेत, हे शाळेच्या प्रगतीचे मोठे यश मानले जात आहे.
गुंजाळ सरांनी यापूर्वी आष्टी तालुक्यातील बीड सांगवी, लामण तांडा, देऊळगाव, पिंपळगाव घाट या शाळांमध्ये शिक्षक म्हणून कार्य केले आहे. ज्या शाळेत त्यांनी सेवा दिली त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबत शिस्त, सुसंस्कार, आत्मविश्वास या मूल्यांचा विकास होण्यासाठी प्रयत्न केले.
मुख्याध्यापक बाबासाहेब वामन व सहशिक्षक रामनाथ गुंजाळ यांच्या पुढाकारातून लमाणवाडी शाळेची रंगरंगोटी, भौतिक सुविधा उभारणी, वृक्षारोपण, परिसर सुशोभीकरण करण्यात आले आहे. एका डोंगराळ व दुर्गम भागातील ही शाळा आज तालुक्यात आदर्श ठरत आहे.
स्वामी विवेकानंद पतसंस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्काराने गुंजाळ सरांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. या पुरस्कारामुळे संपूर्ण लमानवाडी जोमदरा परिसर तसेच आष्टी तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
रामनाथ गुंजाळ सर यांना स्वामी विवेकानंद पतसंस्थेचा यंदाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बाबासाहेब ठोंबरे सर, विजय कोकाटे सर, महादेव आमले सर, प्रवीण धोंडे सर, उमाकांत तांदळे सर व भगवान बोडके सर उपस्थित होते.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!