पाथर्डी(प्रतिनिधी):- सध्या देशभर जातीय, धार्मिक, भाषिक मतभेदाचे विषारी सावट पसरत असताना, पाथर्डी शहरातील सुवर्णयुग तरुण मंडळ मात्र सामाजिक सलोखा आणि जातीय बंधुतेचा अनोखा वारसा जोपासताना दिसत आहे. रविवारी रात्री मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख व जैन धर्मीय व्यक्तींकडून श्रींची महा आरती घडवून आणण्यात आली.या मंडळाने यापूर्वीपासूनच समाजातील सर्व धर्मीय बांधवांना मंडळाच्या कार्यात प्रतिनिधित्व देण्याची परंपरा जपली आहे. महारतीसारख्या पवित्र कार्यातही सर्व धर्मीय बांधवांना सहभागी करून घेत, सामाजिक एकतेचा संदेश पाथर्डीकरांसमोर ठेवण्यात आला. त्यामुळे शहरात सौहार्दाची अनोखी भावना अनुभवायला मिळाली.
सुवर्णयुग तरुण मंडळ हे फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित नसून वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते.शैक्षणिक मदत,आरोग्य शिबिरे,क्रीडा स्पर्धा,शेती,कला,सामाजिक जाणीव जागृतीचे उपक्रमअशा विविध क्षेत्रांत मंडळाने ठसा उमटवला आहे.विशेष म्हणजे, केवळ दिखाऊ उपक्रम न करता समाजाला खरी गरज आहे ते ओळखून त्यासाठी प्रत्यक्ष योगदान देण्याची परंपरा या मंडळाने जपली आहे.सध्याच्या जातीय, धार्मिक वैमनस्याच्या काळात भाषावाद, प्रांतवाद, जातिवाद आणि धर्मवादावर मात करून हे मंडळ सर्व घटकांना एकत्र ठेवण्याचे काम करत आहे. त्यामुळे पाथर्डी शहरात एकतेचा संदेश पसरवण्यात मंडळाचे योगदान लक्षणीय आहे.या मंडळात हिंदू समाजाबरोबरच मुस्लिम समाज बांधवांचाही मोठा सहभाग आहे. अनेक मुस्लिम कार्यकर्ते मंडळाचे सक्रिय सदस्य असून पदाधिकारीही आहेत. तसेच जैन व इतर समाजघटक मंडळात समानतेने काम करत आहेत. त्यामुळे सुवर्णयुग तरुण मंडळ हे खर्या अर्थाने “सर्व धर्मीयांचे एकत्रित व्यासपीठ” ठरले आहे.
फक्त स्थानिकच नव्हे तर राज्य पातळीवरही या मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक उपक्रम, देखावे व एकतेचा संदेश यामुळेच राज्य शासनाने या मंडळाला राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.