spot_img
spot_img

पाथर्डी तालुक्यातील सांस्कृतिक चळवळ समृद्ध करण्यासाठी सुवर्णयुग मंडळाने पुढाकार घ्यावा – आमदार राजळे

पाथर्डी (प्रतिनिधी):- पाथर्डी तालुक्यातील सांस्कृतिक व साहित्यिक चळवळ समृद्ध करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करु. ज्या गावातील सांस्कृतिक वातावरण चांगले असते त्यावरून त्या गावाची एक चांगली व वेगळी ओळख निर्माण होत असते. सुवर्णयुग मुळे पाथर्डीचे नाव राज्यपातळीवर गेले. शहरासह तालुक्यातील सांस्कृतिक चळवळ सशक्त व समृद्ध करण्यासाठी या क्षेत्रातील नामवंत व अनुभवी व्यक्तींना सोबत घेत सुवर्णयुग तरूण मंडळाने यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले‌.
सुवर्णयुग तरूण मंडळाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी आमदार राजळे बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, प्राचार्य अजय भंडारी, प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र शेवाळे, अध्यक्ष गोपालसिंग शेखावत, महीला अध्यक्षा आशा जोजारे, उमेश रासने, बंडु बोरुडे आदी उपस्थित होते.
यावेळी कला क्षेत्रातील योगदानाबद्दल शाहीर भारत गाडेकर यांना सुवर्णयुग कलारत्न तर साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल शायर व कवी हाजी हुमायूनभाई आतार यांना सुवर्णयुग साहित्यरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुढे बोलताना आ. राजळे म्हणाल्या की, स्व. राजाभाऊ राजळे यांचे व्यक्तिगत व तालुक्यातील सांस्कृतिक चळवळीकडे विशेष लक्ष होते. तोच वारसा आपण सामुदायिक प्रयत्न करत पुढे घेऊन जात शहरासह तालुक्यातील सांस्कृतिक व साहित्यिक चळवळ समृद्ध बनवु. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आगामी काळात भावी पिढीतील नवगतांसाठी मार्गदर्शकाची भूमिका घेत नवीन कलाकार व साहित्यिक निर्माणासाठी योगदान द्यावे. पुरस्कार हा मोठाच असतो परंतु तो देताना ज्या व्यक्तीची निवड केली जाते त्या व्यक्तीच्या कार्याने त्या पुरस्काराची उंची वाढते
लोकमान्य टिळकांना अभिप्रेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना सुवर्णयुग तरूण मंडळ कायमच आगळे वेगळे व समाजपयोगी उपक्रम राबवत असते याचा आदर्श इतरांनी घ्यावा असा असतो. सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते व सर्व समावेशक उपक्रम हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे व ते कौतुकास्पद आहे.
यावेळी हुमायून आतार यांनी आपल्या खुमासदार शैलीत विविध संत साहित्याचे दाखले देत, विविध शेरोशायरी पेश करत उपस्थितांना मनमुराद आनंद दिला तर शाहीर गाडेकर यांनी आपल्या पहाडी आवाजात गर्जा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी अभय आव्हाड यांनी ही आपले मनोगत व्यक्त करत पुरस्कार्थी व सुवर्णयुग मंडळाचे अभिनंदन केले. यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध मान्यवर व शेकडो गणेश भक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मानपत्र वाचन वैभव शेवाळे, सुत्रसंचलन अभय गांधी यांनी केले तर आभार मुकुंद लोहिया यांनी मानले.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!