शिरूर कासार (प्रतिनिधी) शिरूर कासार तालुक्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव मायंबा आणि ब्रम्हनाथ येळंब येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीला अखेर शासनाने मान्यता दिली आहे. २६ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या महत्वाकांक्षी योजनेला हिरवा कंदील देण्यात आला असून या निर्णयामागे आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या जीवनात जलसंजीवनी येणार असून आमदार सुरेश धस यांच्या भगीरथ प्रयत्नाने सिंदफणा नदीवरील दोन कोल्हापुरी बंधाऱ्यास मॅरेज मध्ये रूपांतर करण्यासाठी मंजुरी मिळाली असून आमदार सुरेश धस यांनी श्री गणरायाच्या आगमनाचे बळीराजाला एक गिफ्ट दिलं असल्याने आनंदो त्सव साजरा केला जात आहे.
यापूर्वी १ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रकल्पाच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली होती. त्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार सुरेश धस यांनी राज्य शासनाच्या पातळीवर सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळत मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
सिंदफणा ही नदी हंगामी वाहणारी नदी असल्यामुळे १५ ऑक्टोबर नंतर बऱ्याच वेळा प्रवाहित नसते त्यामुळे बंधाऱ्यात पाणीसाठा होत नाहीत तसेच मोठ्या संख्येने असलेल्या अर्ध्या मीटरचे दरवाजे बसवल्यानंतर ऑक्टोबर,नोव्हेंबर मध्ये अवकाळी पावसामुळे नदीला पूर आल्यास दरवाजे वेळेवर काढता न आल्याने पूर पातळी वाहून तीरावरील माती भराव वाहून जाऊन बंधाऱ्यांचे फार मोठे नुकसान होते. याबाबत आमदार सुरेश धस यांच्याकडे वेळोवेळी ग्रामस्थांनी मागणी केली असता या मागणीनुसार पर्यायी मार्ग म्हणून सदर कोल्हापुरी बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करावे अशी मागणी केली होती या मागणी ला आज मंत्रिमंडळात मान्यता मिळाली आहे.
निमगाव मायंबा, ब्रह्मनाथ येळंब व आसपासच्या गावांचे शाश्वत पाण्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊन सिंचन क्षेत्र वाढणार आहे.पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल तसेच भूजलपातळी उंचावून संपूर्ण परिसरातील पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होऊन दुष्काळी भाग जलयुक्त होणार आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले.या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजप महायुती सरकारमधील सर्व मंत्रीमंडळाचे आभार मानले आहेत.आष्टी मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार सुरेश धस यांचे निमगाव मायंबा,ब्रह्मनाथ येळंब व आसपासच्या गावाच्या ग्रामस्थांनी आनंद उत्सव साजरा करत आभार मानले आहेत.