पाथर्डी प्रतिनिधी:- दुष्काळ, पार्किंग समस्येची गंभीरता, खाजगी पार्किंग वाल्याकडून होणारी अरेरावी व या समस्येकडे पोलिसांचे होणारे दुर्लक्ष आणि देवस्थान समितीचे गंभीर समस्येकडे होणारी डोळेझाक याचा एकत्रित फटका मोहटा देवस्थान समितीला बसून अवघ्या एक कोटी अडोतीस लाख रुपयाची रोख रक्कम यावर्षी मोजण्यात आली.
यावर्षी दानपेटीत सुमारे १ कोटी १लाख, देणग्या पावती द्वारे सुमारे ३३ लाख व आँनलाईन देणगी द्वारे सुमारे ५ लाख रुपये रोख स्वरूपात प्राप्त झाले. तर सुमारे सोने २६७ ग्रॅम चांदी ९ किलो आदी वस्तुरुपात देणग्या गोळा झाल्या.
मागील वर्षी सुमारे एकुण दोन कोटी रुपये देणगी स्वरुपात प्राप्त झाले होते. यामध्ये दानपेटीत रोख १कोटी २७लक्ष, पावती देणगी द्वारे ४० लक्ष रुपये, आँनलाईन ४ लाख ८६ हजार रुपये, सोने ४०० ग्रॅम, चांदी आठ किलो आठशे ग्रॅम आदी वस्तुरुपात देणग्या गोळा झाल्या होत्या.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या नवरात्र उत्सवात पहिले पाच दिवस भाविकांची गर्दीच नव्हती. पारनेर तालुक्यातील भाविकांच्या एकत्रित दर्शन सुविधेचा आमदार निलेश लंके यांचा उपक्रम यात्रेत गर्दी वाढवणारा ठरला. देवस्थान मध्ये येण्यासाठी भाविकांना मोठ्या त्रासाला सामोरे जाऊन मंदिरापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर वाहने अडवली जात. त्यामध्ये अर्धा किलोमीटरचा चढणीचा घाट आहे रखरखत्या उन्हात ऑक्टोंबर हिट मध्ये कोणी ही भाविक पायी हा रस्ता चालू शकत नाही. देवस्थान समितीची एकमेव गाडी भक्त निवासापर्यंत येई. ती गाडी व आणखीन एक दोन वाहने ठेवून भाविकांना देवस्थानच्या अधिकृत पार्किंग पर्यंत नेण्याची व्यवस्था केली असती तर दर्शनाचा त्रास वाचून भाविकांची दानपेटीत देणगी मुक्तहस्ताने पडली असती. सहाव्या माळी नंतर भाविक वाढले तसा वाहने आढळणाऱ्यांचा त्रास वाढला अत्यंत उद्धटपणे व अरेरावीच्या भाषेत खाजगी वाहनांना पार्किंग स्टॅन्ड मध्ये गाडी घालण्याची होणारी सक्ती तेथे उपस्थित असणारे पोलीसही बघत होते. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गरोदर माता, लहान मुले सुद्धा पायी चालण्याच्या दुष्टचक्रातून वाचली नाहीत. अन्य देवस्थान मध्ये अशी गैरसोय अगोदर दूर होते. माहूरगडचा घाट यापेक्षा मोठा असून एसटी बसेस व सरकारी वाहने सोयीस्कर असल्याने कोणालाही त्रास झाला नाही. भाविक हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी व्यावसायिक व स्थानिक कार्यकर्ते निर्णय प्रक्रियेत प्रभावी ठरल्याने मोहरी मार्गे पारनेरची वाहने आणण्याचा निर्णय ऐनवेळी बदलून मुख्य रस्त्याने आणल्याने खाजगी पार्किंग सुविधांवर प्रशासनाला अवलंबून राहावे लागले. कोजागिरी पौर्णिमेला असा जाचक त्रास नसल्याने नवरात्री सारखी गर्दी त्या दिवशी झाली. काही भाविक आठव्या माळीला दूरवरचे पार्किंग स्टॅन्ड व अरेरावी पाहून कळसाचे दर्शन घेऊनच परतले.