spot_img
spot_img

सुवर्णयुग तरुण मंडळाचा २०२५ चा पुरस्कार शाहीर भारत गाडेकर व हुमायून आतार यांना जाहीर

पाथर्डी प्रतिनिधी (अनिल खाटेर) :- राज्यस्तरीय पारितोषिक प्राप्त सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणेशोत्सवात दिला जाणारा मानाचा सुवर्णयुग ‘कलारत्न’२०२५ हा पुरस्कार तिलोक जैन विद्यालयाचे पर्यवेक्षक आणि प्रख्यात शाहीर भारत गाडेकर यांना, तर सुवर्णयुग ‘साहित्यरत्न’ २०२५ हा पुरस्कार साहित्यिक हुमायून आतार यांना जाहीर झाला आहे. यंदाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष गोपालसिंह शेखावत यांनी ही माहिती दिली.
भारत गाडेकर यांनी गेल्या तीन दशकांपासून आंबेडकरी जलशाच्या माध्यमातून ग्रामीण भागात व्यसनमुक्ती, हुंडाबळी विरोध, प्रौढ शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, मोबाइलचे दुष्परिणाम, लेक वाचवा अशा विविध विषयांवर आपल्या शाहिरी गीतांद्वारे समाजप्रबोधन करून सामाजिक चळवळींना गती दिली आहे. पोतराज, पोवाडे, भारुड आणि लोकगीतांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीचे मोलाचे कार्य केले आहे. लोकजागर आणि लोकसंगीताच्या कार्यक्रमांतून अहमदनगर, पुणे आकाशवाणी तसेच दूरदर्शनच्या “ताक-धिना-धिन” या कार्यक्रमातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. शाहीर गाडेकर यांनी आपल्या स्वतःच्या रचनांबरोबरच शाहीर अण्णाभाऊ साठे,शाहीर वामनदादा कर्डक,शाहीर साबळे,शाहीर विठ्ठल उमाप यांच्या गीतांना आपल्या आवाजाने अजरामर केले.त्यांच्या याच कार्याचा गौरव म्हणून मंडळाच्या कलारत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड केली गेली.
साहित्यिक हुमायून आतार यांचाही गावखेड्यापासून अखिल भारतीय
मराठी साहित्य संमेलनापर्यंतचा प्रवास कष्ट, जिद्द आणि सातत्याने रेखाटला गेला आहे.

साहित्यिक हुमायून आतार यांनी २००० साली कृष्णा भोजणालय साहित्य मंडळाचे संस्थापक सदस्य म्हणून कार्याला सुरुवात केली. २००० ते २०२४ या काळात त्यांनी प्रत्येक साहित्य संमेलनात सहभाग घेतला. शब्द गंध साहित्य परिषदेचे २००१ पासून सदस्य असलेले आतार यांनी नगर, कुद्रेमानी (बेळगाव), पिंपळगाव तप्पा येथील साहित्य संमेलनांतही सक्रिय सहभाग नोंदवला. २०१७ मध्ये कृष्णा भोजणालय साहित्य मंडळाच्या स्वागताध्यक्षपदी त्यांची निवड झाली.अनेक कविसंमेलन त्यांनी आपल्या कविता व शेरो-शायरीने गाजवली. साहित्याबरोबरच सामाजिक कार्यातही शहरात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कवी अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, फ. मु. शिंदे, रामदास फुटाणे यांसारख्या ज्येष्ठ साहित्यिकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध राहिले. त्यांच्या या साहित्य आणि सामाजिक कार्याची दखल घेत सुवर्णयुग तरुण मंडळाने त्यांना साहित्यरत्न २०२५” पुरस्कार जाहीर केला आहे.

सुवर्णयुग तरुण मंडळाने या दोन दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा गौरव करून सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाला सलाम केला आहे. मंडळाच्या वतीने हे पुरस्कार गणेशोत्सवात 30 ऑगस्ट रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
सुवर्णयुग मंडळाने हे पुरस्कार जाहीर केल्यानंतर सर्व स्तरातून दोन्ही पुरस्कार्थीचे अभिनंदन होत आहे.

spot_img

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

error: Content is protected !!