पाथर्डी (प्रतिनिधी): – जागतिक स्तरावर भारत हा युवकांचा देश म्हणून गणला जातो . परंतु दुर्दैवाने हा युवक सध्या व्यसनाच्या विळख्यात अडकून पडलेला आहे . त्यामुळे अनेक समस्येला तो बळी पडत आहे . सद्यस्थितीत विद्यार्थी वर्गासाठी शिक्षण ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्यातूनच त्यांचे भविष्य घडू शकते . त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी व्यक्त केले. केंद्रीय गृह मंत्रालय , भारत सरकार ,नवी दिल्ली आणि पोलीस महासंचालक , महाराष्ट्र राज्य , मुंबई , उपविभागीय पोलीस अधिकारी , शेवगाव उपविभाग व पाथर्डी पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त दिनांक 13 ते 16 ऑगस्ट या दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत . त्या अनुशंगाने ते शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयातील विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते . यावेळी पुढे बोलताना त्यांनी अध्यात्माचा आधार घेत आपणास मिळालेले शरीर किती अनमोल आहे व व्यसनाच्या आहारी जाऊन आपण त्याची कशी दुरावस्था करून घेत आहोत या विषयी सविस्तर विवेचन केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अजय भंडारी यांनी प्रास्ताविक करताना आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परीणाम विषद केले व भविष्यकालीन वाटचालीसाठी शिक्षण किती महत्त्वाचे आहे हे पटवून दिले .यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री , उमेश मोरगावकर , अमोल कांकरिया , अक्षय वायकर, सचिन दिनकर , प्रशांत सोनवणे, शन्नोभाई पठाण, चंद्रकांत वाखुरे, व विद्यालयाचे उपप्राचार्य अशोक गर्जे , पर्यवेक्षक मनिषा मिसाळ , भारत गाडेकर सुधाकर सातपुते या सह मान्यवर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अजय भंडारी यांनी केले तर सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी करून आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मनिषा मिसाळ यांनी मानले .