पाथर्डी (प्रतिनिधी):- मोक्कासह इतर चार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या फरार आरोपी अक्षय दत्तात्रेय मरकड़ (रा. निवडुंगे) याला पाथर्डी पोलिसांनी जेरबंद केला.तो अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
पाथर्डी तालुक्यातील निवडुंगे गावच्या शिवारात २३ जुलै २०२५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास फिर्यादी अक्षय राजेंद्र जायभाये (वय २५, रा. शिक्षक कॉलनी) हे त्यांचे मित्र शिवम भारत आठरे (रा. पारेवाडी,) असे तिसगावकडून पाथर्डीकडे मोटारसायकलवरून येत असताना आरोपी विकी पोपट भोसले (रा. कासारवाडी, ता. पाथर्डी, अक्षय दत्तात्रय मरकड (रा. निवडुंगे, ता. पाथर्डी, लखन बाबासाहेब कासार (रा. कासारवाडी, ता. पाथर्डी) व
एक अनोळखी इसम अशांनी पाठीमागून एका विनानंबरच्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून वेगाने फिर्यादीच्या मोटारसासयकलला पाठीमागून जोराची धडक देऊन त्यांना खाली पाडले. या वेळी विकी पोपट भोसले, अक्षय दत्तात्रय मरकड व त्याचा एक अनोळखी साथीदार अशांनी फिर्यादी व साक्षीदारांना लोखंडी रॉडने मारहाण करून फिर्यादीच्या जवळील
रोख ७५०० रुपये व त्याच्या गळ्यातील ७५ हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची चैन बळजबरीने काढून घेत फिर्यादी व साक्षीदारांना जीवे ठार मारण्याची धमकी देत निघून गेले. याबाबत अक्षय जायभाये यांनी दि. २५ जुलै २०२५ रोजी पाथडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना आरोपी अक्षय दत्तात्रय मरकड (रा. निवडुगे, ता. पाथर्डी) हा आज दि २ ऑगस्ट
२०२५ रोजी हनुमान टाकळी शिवारात आला असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या सुचनेनुसार पोलिस उपनिरीक्षक संदिप ढाकणे, पोलीस कर्मचारी कानिफनाथ गोफणे यांच्या पथकाने आरोपीचा पाठलाग करत त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सदर गुन्हाबाबत विचारपूस करता त्याने त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपी अक्षय दत्तात्रय मरकड हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर मोक्का सह पाथर्डी पोलीस स्टेशन व सांगवी पोलीस स्टेशनला अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत