पाथर्डी (प्रतिनिधी):- सरकारी अधिकारी म्हटलं की बदली आणि नियुक्तीचा खेळ पाठशिवणीला कायमचा ठरलेलाच असतो. पण मिळालेल्या सेवेच्या कालावधीत त्या भागात केलेले काम, तुमची कार्यशैली, जनतेशी साधलेला संवाद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना दिलेली वागणूक. यांसारख्या बऱ्याच गोष्टी तुमची ओळख बदली झाल्यानंतर देखील कायम ठेवतात. अन पुढच्या ठिकाणी प्रस्थान करण्याआधी त्याठिकाणी दिला जाणारा निरोपाचा सन्मान सोहळा हे तुमच्या केलेल्या कामाची पोचपावती असते. त्यात पोलीस विभागातील नोकरी म्हणजे खरोखर तारेवरची कसरत ठरते.
असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी केले.
पाथर्डी पोलीस स्टेशनचे जिगरबाज, शांत संयमी व कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व अभ्यासू अधिकारी म्हणून सेवा दिलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांची स्थानिक गुन्हे शाखेत बदली झाल्याने काल त्यांना पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचार्यांच्या वतीने गहिवरलेल्या व भावनिक वातावरणात निरोप देण्यात आला. त्यावेळी पो नि. पुजारी बोलत होते.
काही दिवसांपूर्वीच भोये यांची बदली झाली होती परंतु पाथर्डी पोलीस स्टेशनचे कामकाज पाहता त्यांना आपला कार्यभार सोडायला सुमारे दोन महिने उशीर झाला. याबद्दल ही पुजारी यांनी दिलगीरी व्यक्त करत श्री भोये आगामी काळात ज्या ज्या ठिकाणी सेवा काळात कार्यरत राहतील त्या त्या ठिकाणी आपल्या वेगळ्या कार्यशैलीमुळे उत्कृष्ट सेवा बजावतील व पोलीस प्रशासनाचा नावलौकिक वाढवतील अशा शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी भोये यांच्या सोबत काम केलेल्या अनेक सहकार्यांना गहीवरुन आले होते. त्यामुळे अधिकाऱ्याचा हा निरोप समारंभ चर्चेचा विषय ठरला. गेली काही वर्षे हरीश भोये यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये कार्यभार पाहताना सर्वसामान्यांशी संपर्क वाढविण्याबरोबरच तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तसेच तालुक्यातील खास करून मढी तिसगाव जवखेडे येथील हिंदू मुस्लिम वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद ठेवून शांतता प्रस्थापित करण्याला महत्व दिले होते. मोहटा व मढी यात्रा, नवरात्रोत्सव गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासनाचा दबदबा निर्माण करत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पोलीस दलाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करत पोलीस स्टेशनचा कारभार लोकाभिमुख करण्यात मोठे प्रयत्न केले. त्यामुळे नागरिकांबरोबरच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यात ते लोकप्रिय झाले होते. पोलीस निरीक्षक व सर्व पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी भोये यांचा सत्कार केला. यावेळी अनेक जण भावुक झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेत बदली नंतर श्री भोये यांना पत्रकारांसह अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी पोलीस निरीक्षक विलास पुजारी, पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, उपनिरीक्षक विलास जाधव, उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, उपनिरीक्षक संदीप ढाकणे, वरिष्ठ पोलीस कर्मचारी नितीन दराडे, गुप्तवार्ता विभागाचे नागेश वाघ, पोलीस कॉन्स्टेबल संदीप बडे, अल्ताफ शेख, इजाज सय्यद, भगवान गरगडे, मधुकर कोकाटे, निलेश गुंड, लबडे, संदीप कानडे, कानिफ गोफणे, आण्णा पवार, पोलीस कर्मचारी सानप, बांगर, बनकर, पोटभरे, वडते, ढवळे,जाधव, बडे, निळे, खेडकर, बुधवंत आदी उपस्थित होते.