अहिल्यानगर (प्रतिनिधी): “ गेल्या वीस वर्षापासून शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने नवोदितांना व्यासपीठ मिळण्यासाठी पुस्तक प्रकाशन, काव्य संमेलन, कथा, कविता लेखन कार्यशाळा, पुस्तकावर परिसंवाद, राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन,बाल संस्कार शिबीर असे विविध उपक्रम राबवत असून महाबळेश्वर येथे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद व काव्य संमेलनही संस्थेच्या वतीने घेण्यात आले होते, आता यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आळंदी देवाची या ठिकाणी दुसरे राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रम व काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, यातील काव्यसंमेलनामध्ये नवोदितांनी सहभागी व्हावे.” असे आवाहन शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी संस्थापक सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्यवाह शाहीर भारत गाडेकर, राजेंद्र चोभे,प्रा.डॉ.अनिल गर्जे, मकरंद घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.संस्थेच्या वतीने नवीन लिहिणाऱ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देण्यात येते, त्यासाठी संस्थेचे सभासद होणे आवश्यक असते,नवीन सभासद वाढवण्यासाठी राज्यस्तरीय काव्यसंमेलन चे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुके, बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर या ठिकाणी संस्थेच्या जिल्हा शाखा कार्यरत असून इतर जिल्ह्यांमध्ये प्रतिनिधी आहेत.आता इतर जिल्ह्यातही शाखा सुरू करण्यात येत आहेत.सभासद होऊन या राज्यस्तरीय काव्यसंमेलनात सहभागी होता येईल. तसेच त्या जिल्ह्यातील जिल्हा शाखा मध्ये पदाधिकारी म्हणून सहभागी होता येईल.या निमित्ताने सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात योगदान असणाऱ्या काही लेखक, कवी व कार्यकर्त्यांचा सन्मानही करण्यात येणार आहे.
शब्दगंध च्या वतीने दर तीन वर्षातून मध्यवर्ती साहित्य संवाद कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून यापूर्वी पहिला कार्यक्रम महाबळेश्वर येथे भाऊसाहेब थोरात गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता.आता दुसरा राज्यस्तरीय मध्यवर्ती साहित्य संवाद आळंदी येथे होत आहे.या कार्यक्रमात होणाऱ्या काव्य संमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी नवोदित कवींनी आपली काव्य रचना, परिचय, पासपोर्ट फोटो दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंत ९९२१००९७५० या मोबाईल क्रमांकावर व्हाट्सअप द्वारे पाठवाव्यात.असे आवाहन ज्ञानदेव पांडुळे, राज्य संघटक प्रा.डॉ.अशोक कानडे, प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे,जयश्री झरेकर, प्रा.डॉ.तुकाराम गोंदकर, स्वाती ठुबे, राजेंद्र फंड, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, अरुण आहेर, रवींद्र दानापुरे,प्रशांत सूर्यवंशी, शर्मिला गोसावी, राजेंद्र पवार, शिरीष जाधव यांनी केले आहे.