पाथर्डी प्रतिनिधी :- तालुक्यातील कोपरे गावात एक विचित्र पण डोळे उघडणारा प्रकार समोर आला आहे. कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ, ओठांवर अध्यात्मिक मंत्र… आणि तरीही हातात दारू विक्रीचा धंदा! या विरोधाभासाचा शेवट पोलिसांनी एका अनोख्या पद्धतीने केला आहे.
कोपरे गावातील हा व्यक्ती स्वतःला माळकरी म्हणवतो. त्याला तीर्थयात्रांचा छंद होता, पण मुलांपासून वेगळे राहिल्यामुळे यात्रा करण्यासाठी पैसे उभे करण्यासाठी त्याने सरळ दारू विक्रीचा मार्ग निवडला. सुरुवातीला किराणा दुकान चालवत होता, पण नफा कमी वाटला. मग गावातील तरुणांना व्यसनाच्या विळख्यात ढकलून स्वतः मात्र तीर्थयात्रा करत राहिला. आषाढी यात्रा, दोन धाम… सगळं दारूच्या पैशातूनच!
पण गावातील महिलांनी हे फार काळ सहन केले नाही. चार दिवसांपूर्वी संतप्त महिलांनी थेट पोलीस स्टेशनवर मोर्चा नेला आणि नावासह तक्रार केली. पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी याची गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी तातडीने उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर व पथकासह कोपरे गाठले.
दारू विक्री करणाऱ्याच्या किराणा दुकानावर छापा टाकला. मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त केला. संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनला आणले. त्याचे रंगरूप पाहून सगळे चकित झाले — कपाळावर गंध, गळ्यात तुळशीमाळ आणि तरी दारूचा अवैध धंदा!
पोलीस निरीक्षक पुजारी हे स्वतः अध्यात्मिक विचारांचे असल्याने त्यांनी या माळकरी व्यक्तीला पत्रकारांसमोर उभे केले आणि बोलते केले. तो आपल्या “तीर्थयात्रांचा खर्च” सांगू लागला आणि सगळ्यांनी डोके धरले.
दरम्यान, पोलीस दालनाबाहेर त्याचा मुलगा बापाला हातवारे करून अधिक माहिती बाहेर जाऊ न देण्याचा इशारा देत होता. हे पाहून पुजारींनी मुलाला सुद्धा बोलवून घेतले. त्यांनी धर्मशास्त्रातील दाखले देत दोघांना समजावले — “तुमच्या घरात दोन जेसीबी आहेत, उत्पन्न आहे, मग बापाने दारू विकावी कशाला? वडिलांची जबाबदारी तुमची नाही का?” असा सवाल केला.
पोलिसांनी कुटुंब व्यवस्थेची खरी किंमत समजावली. शेवटी माळकरी बापाने पोलिसांना शब्द दिला — “साहेब, तुमच्या आदेशानुसार दारू विक्री बंद करतो. पण माझ्याविरोधात मोर्चा काढणाऱ्या बायकांनी त्यांचे नवरे सांभाळावेत. ते इतरत्र दारू प्यायला जाऊ नयेत याची खात्री देतील का?” हा खरा सवाल आहे.
पोलीस निरीक्षकांनी त्याला खऱ्या धर्माचा अर्थ समजावला — “धर्म फक्त तुळशीमाळीत नाही, तर कुटुंब टिकवण्यात आहे.”
या घटनेनंतर गावात सर्वत्र चर्चा आहे की पोलिसांनी एक ही शिवी चापटीशिवाय, कोणतीही चापट न मारता एका माळकरी दारू विक्रेत्याचे मतपरिवर्तन घडवले. गावातील अनेक कुटुंब उध्वस्त होण्यापासून वाचवले. या कृतीमुळे पोलिस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या कारवाईत निरीक्षक पुजारी यांच्यासह उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, महादेव गुट्टे, विलास जाधव, संदीप ढाकणे, रविंद्र लबडे, सागर बुधवंत, एस.एस. कुसळकर, महेश रुईकर, भगवान टकले, अक्षय लबडे, ज्ञानेश्वर इलग, इजाज सय्यद, संजय जाधव यांनी सहभाग घेतला.