आष्टी – (प्रतिनिधी) जिल्हा परिषद बीड ची सर्वांत जास्त पटसंख्या असलेली बीड जिल्ह्यातील एकमेव मुलींची आदर्श शाळा पीएम श्री जिल्हा परिषद कन्या प्रशाला आष्टी, ता. आष्टी, जि. बीड या प्रशालेत दिवाणी न्यायालय क. स्तर आष्टी च्या तालुका विधी सेवा समिती आष्टी व वकील संघ आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता कायदे विषयक जनजागृती शिबीर संपन्न झाले.
सुरुवातीस महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, आईसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते पुष्प वाहून व श्रीफळ वाढवून करण्यात आले. तद्नंतर शाळेतील गीत मंचानी महाराष्ट्र गीत सादर केले. गीताला हार्मोनियम ची साथ सतिष दळवी यांनी दिली. यानंतर प्रमुख अतिथी दिवाणी न्यायाधिश क. स्तर आष्टी मा. श्री. के. के. खोमणे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर आष्टी मा. श्रीमती पी. जी. इनामदार, २ रे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर आष्टी मा. एम. आर. बडाख, आष्टी वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ अजय जेवे, विधिज्ञ यासिर सय्यद, विधिज्ञ बाळासाहेब झांबरे, विधिज्ञ विजयकुमार शेकडे, विधिज्ञ शरद कदम, विधिज्ञ बापूराव गर्जे, विधिज्ञ बबन दाणी, विधिज्ञ गौतम निकाळजे, विधिज्ञ सतिषकुमार गायकवाड, विधिज्ञ संग्राम गळगटे, विधिज्ञ अविनाश निंबाळकर, मुख्याध्यापक आबासाहेब खताळ यांचा यथोचित सन्मान प्रशालेच्या वतिने करण्यात आला. याप्रसंगी सुरुवातीला कायद्याची तोंडओळख विधिज्ञ बापूराव गर्जे यांनी करवून दिली. त्यानंतर लहान मुलांचे कायदे विषयक अधिकार विधिज्ञ गौतम निकाळजे यांनी सांगितले. तसेच यावेळी विधिज्ञ बाळासाहेब झांबरे यांनी कायदे विषयक माहिती, बाल न्याय विषयक माहिती, कायद्याची सक्ती, विधिज्ञ सतिषकुमार गायकवाड यांनी शिक्षण विषयक कायदा, विधिज्ञ विजयकुमार शेकडे यांनी लहान मुलांचे शिक्षण विषयक कायदे, विधिज्ञ संग्राम गळगटे यांनी बेटी बचाव, बेटी पढाव याबाबत विद्यार्थींनींना सखोल मार्गदर्शन केले.
विशेष बाब म्हणजे सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर आष्टी मा. श्रीमती पी. जी. इनामदार यांनी पोस्को कायदा विषयी माहिती दिली. तसेच हा कायदा गुन्हे होत असतांनाच त्यातुनच निर्माण झालेला असून सर्वांसाठी हा कायदा आहे असे सांगितले तसेच गुड टच, बॕड टच याबाबतीतही त्यांनी परखडपणे मत व्यक्त करुन सखोल मार्गदर्शन केले. यानंतर दिवाणी न्यायाधिश क. स्तर आष्टी मा. श्री. के. के. खोमणे यांनी नालसा बाबत सखोल मार्गदर्शन करुन मोफत विधी सेवा समिती विषयी अधिकची माहिती सांगितली. तसेच ते म्हणाले की, व्यासपीठावरुन ज्यांनी – ज्यांनी आपणांस कायद्याविषयी जी – जी माहिती सांगितली ती आपण सर्वांनी सर्वांपर्यंत पोहोच केली पाहिजे असेही शेवटी ते म्हणाले. या कायदे विषयक जनजागृती शिबीराचे बहारदार सुत्रसंचलन विधिज्ञ अविनाश निंबाळकर यांनी केले तर आभार वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ अजय जेवे यांनी मानले. सदरील कायदे विषयक जनजागृती शिबीर यशस्वी करण्यासाठी दिवाणी न्यायालय क. स्तर आष्टी येथील कर्मचारी अशोक जाधव, बापुराव आर्सुळ व कन्या प्रशालेतील आदर्श शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.