कडा (प्रतिनिधी) – आष्टी तालुक्यातील हिवरा दादेगाव डोंगरगण भोजेवाडी या गावचे श्रद्धास्थान व ग्रामदैवत समजले जाणाऱ्या रोडागिरी बाबांचा यात्रा उत्सव गुरुवार दि. १० रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी निसर्गरम्य डोंगर माथ्यावर असलेल्या दर्गाह परिसरात हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या सलोख्याने एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करत असतात. बाबांच्या दर्शनासाठी मुंबई ,कल्याण,पुणे तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक हजेरी लावतात. हिरव्यागार वनराईने नटलेला हा परिसर यात्रेप्रसंगी गर्दीने फुललेला असतो. गाड्यांची पार्किंग व्यवस्था केलेली आहे. रंगरंगोटी सह विद्युत रोशनाई देखील करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त मोठ्या श्रद्धेने भाविक दिवसभर यात्रेचा आनंद लुटतात. दिवसभर चार गावच्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक लेझीम खेळत, ढोल – ताशा सह हलगीच्या गजरात निघते. तिन्ही गावच्या फुलांच्या चादर चढवल्या जातात. दुसऱ्या दिवशी गावभरात शेरणी वाटली जाते. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला जातो. जागृत दर्गाह म्हणून भाविक येथे नवस करतात. पूर्वी एकेश्वरवादाचा प्रचार व प्रसार करत भारतभर भ्रमण करणाऱ्या सुफी संतांपैकीच रोडागिरी बाबा होते. त्यांचे बंधू कड्याचे मौलाली बाबा धामणगावचे सय्यद बादशाह बाबा हि देवस्थानेही आष्टी तालुक्यात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पुरातन दर्गाह हि वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळते. यात्रेत सर्व भाविकांनी शांततेत सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिवरा – भोजेवाडी ,दादेगाव, डोंगरगणचे सरपंच मंडळी यांनी केले आहे.