देवळाली (प्रतिनिधी) आष्टी तालुक्यातील देवळाली येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी मेंढवाडी देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने देवळाली येथील मेंढवाडी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते.मेंढवाडीची देवीचे मंदिर हे देवळाली गावाच्या आग्नेय दिशेस असलेल्या डोंगरावर आहे श्री जगदंबा मातेचे मंदिर हे खुप विलोभनिय असुन तुळजापुर देवीचे एक शक्तीपीठ आहे, भक्ताच्या नवसाला पावणारी आणि इच्छापूर्ति करणारी श्री जगदंबा माता एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते, मंदिराच्या गाभाऱ्यात देवीच्या दोन सुंदर मुर्ती आहेत एक तुळजापुरची देवी तर दुसरी मेंढवाडी देवी असे एकत्र असलेले देवीचे मंदिर महाराष्ट्रात एकमेव आहे. देवीच्या मंदिराचे भव्यदिव्य बांधकाम हे लोकवर्गनीतुन करण्यात आले आहे.या देवीच्या मंदिरात नवरात्रात घटस्थापना करून नऊ दिवस देवीची गाणी आराधी जागरण केली जाते. दसऱ्याच्या दिवशी देवी सीमोलंघन खेळून आल्यावर श्रमनिद्रा घेते. ही निद्रा दसऱ्याच्या दिवसापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असते. पौर्णिमेच्या दिवशी पैठण व नागतळा येथून कावडीने आणलेल्या पाण्याने देवीचा अभिषेक केला जातो धूप आरतीसह देवीचे विधिवत पूजन केले जाते.प्रतिवर्षी भरणाऱ्या आश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने खूप मोठी यात्रा भरते.यात्रेत खाऊची दुकाने,स्टेशनरी,लहान मुलांना खेळण्यासाठी पाळणे, आदी दुकाने आली होती.अश्विन पौर्णिमेच्या निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातून भाविक भक्त दर्शनासाठी व केलेला नवस फेडण्यासाठी आले होते.