आष्टी (प्रतिनिधी): जिल्ह्यातील बियाणे, खते व कीटकनाशके यांच्या खरेदी विक्री, गुणवत्ता व पुरवठयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणींचे तत्काळ निवारण करण्यासाठी खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट या कालावधीत जिल्हास्तरावर ‘निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे, असे कृषी विभागाने कळविले आहे.
सदर नियंत्रण कक्षाशी दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत भ्रमणध्वनी क्रमांक ९४०३ ३०८ ६०८ तसेच टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकारी श्री साहिल सय्यद यांनी जिल्यातील सर्व नागरिकांना केले आहे.
*जास्त दराने खताची विक्री झाल्यास कारवाई*
पुढील काही दिवसात पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीस सुरूवात केली आहे.
बियाणे व खते यात बोगस कंपन्यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये याची काळजी कृषी विभागामार्फत घेतली जात आहे. युरिया खत ज्यादा दराने विक्री केल्याचे व युरिया सोबत इतर अनावश्यक खते लिंकिंग करीत असल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मोहीम अधिकारी सायप्पा गरांडे यांनी दिला आहे.
*तालुक्याशी संपर्क साधा*
खते, बियाणे विक्रीदरम्यान काही गैरव्यवहार होत असल्यास शेतकऱ्यांनी स्थानिक कृषी सहायक किंवा तालुक्यातील कृषी अधिकारी, पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“जिल्हास्तरावर १ व तालुकास्तरावर प्रत्येकी १ असे जिल्ह्यात एकूण १२ भरारी पथके स्थापन केली आहेत. त्याचबरोबर दि. १ जून २०२५ पासून कृषी निविष्ठा संबंधित तक्रार निवारण कक्षबाबत माहीती देणारे फलक प्रत्येक निविष्ठा केंद्रामध्ये दर्शनिय भागावर लावण्याबाबत बंधनकारक करण्यात आलेले आहे. जिल्ह्यातील कृषी विभागाचे पथक बारीक लक्ष ठेऊन आहे.”
साहिल सय्यद
(कृषी विकास अधिकारी, जि. प. बीड)